मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान असेल. मुंबईतील वानखेडेवर होणारा महामुकाबला जिंकणारा संघ अंतिम फेरी गाठेल. याआधी दोन्ही संघ धर्मशालातील स्टेडियमवर आमनेसामने आले होते. त्यावेळी भारतानं ४ गडी राखून विजय मिळवला होता. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतानं तब्बल २० वर्षांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला. गेल्या २० वर्षांत वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचा संघ टीम भारतावर भारी पडला आहे. पण वर्ल्डकपम स्पर्धा भारतात असल्यास टीम इंडियानं न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर टीम इंडियासमोर किवींनी पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यामुळे आज भारतानं विजय मिळवल्यास तो किवींसाठी पराभवाचा चौकार असेल.आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारतीय मैदानात दोन्ही संघ सर्वप्रथम १९८७ मध्ये आमनेसामने आले. भारतानं हा सामना १६ धावांनी जिंकला. यानंतर याच स्पर्धेत दोन्ही संघ पुन्हा एकदा भिडले. त्यात सुनिल गावस्करांनी शतक साजरं केलं. वेगवान गोलंदाज चेतन शर्मांनी हॅट्ट्रिक घेतली. हा सामना भारतानं जिंकला. त्यानंतर दोन्ही संघ वर्ल्डकपमध्ये यावेळी आमनेसामने उभे ठाकले. धर्मशालातील स्टेडियमवर झालेला सामना भारतानं ४ गडी राखून जिंकला. त्यामुळे भारताची कामगिरी न्यूझीलंडला घाम फोडणारी आहे. नऊपैकी नऊ सामने जिंकणारा भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये पूर्ण फॉर्मात आहे. तर न्यूझीलंडच्या संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी शेवटच्या सामन्यापर्यंत वाट पाहावी लागली. दोन्ही संघ वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ९ वेळा आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडनं ५, तर भारतानं ४ वेळा विजय मिळवला आहे. आजचा सामना जिंकून न्यूझीलंडची बरोबरी करण्याची संधी भारताकडे आहे.