नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन) शेअरने विक्रमी उच्चांकावर मुसंडी मारली आहे. त्याच वेळी, कंपनीने नुकतेच डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले, ज्यात कंपनीच्या नफ्यात जोरदार वाढ झाली. विमा कंपनी एलआयसीने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ९,४४४ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आणि त्यानंतर भागधारकांना खूश केले आहे. सकारात्मक तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर एलआयसीने भागधारकांना प्रत्येक शेअरवर ४ रुपये लाभांशची घोषणा केली.

लक्षात घ्या की गेल्या वर्षी एलआयसीचा नफा ६,३३४ कोटी रुपये होता, तर २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालात कंपनीच्या नफ्यात ४९% वाढ झाली.

एलआयसी पाचवी मौल्यवान कंपनी

गेल्या बाजार सत्रात म्हणजे गुरुवारी, भारतीय आयुर्विमा महामंडळच्या (LIC) शेअरनी ६%हून अधिक उसळी घेतली आणि यासह कंपनीचे बाजार मूल्य (मार्केट कॅप) ६.९९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले ज्यामुळे एलआयसी देशातील पाचवी सर्वात मौल्यवान कंपनी ठरली. गेल्या सत्रात एलआयसीचे शेअर BSE वर ५.८६% वाढीसह १,१०६.२५ रुपयांवर बंद झाले. तर व्यापार दरम्यान एका वेळी, स्टॉकने ९.५१ टक्क्यांची उडी घेऊन १,१४४.४५ रुपयांच्या उच्चांकावर झेप घेतली.

याशिवाय नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE वर कंपनीचे शेअर ६.४६% वाढीसह १,११२ रुपयांवर बंद झाले. अशापकारे शेअरच्या किमती वाढल्यामुळे एलआयसीचे बाजारमूल्य ३८,७४०.६२ कोटी रुपयांनी वाढून ६,९९,७०२.८७ कोटी रुपये झाले आणि आयसीआयसीआय बँकेला मागे टाकत मार्केट कॅप (Mcap) नुसार एलआयसी देशातील पाचवी सर्वात मौल्यवान कंपनी बनली.

LIC कडून लाभांश जाहीर
तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना एलआयसीने म्हटले की या कालावधीत कंपनीला एकूण १.१७ लाख कोटी रुपयांचा प्रीमियम मिळाला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा ५% अधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १.११ लाख कोटी रुपयांचा प्रीमियम मिळाला होता. दरम्यान, कंपनीच्या बोर्डाने पुढील ३० दिवसांत भागधारकांना प्रति शेअर ४ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली.

महिन्याभरात एलआयसी शेअर उसळला
नोव्हेंबरपासून एलआयसी स्टॉकमध्ये तेजीचे वादळ आले ज्यामुळे शेअर सातत्याने चर्चेत आहे. गुरुवारी एलआयसी स्टॉकने १,१४५ रुपयांचा उच्चांकावर मुसंडी मारली तर बाजार बंद होण्याच्या वेळी शेअर १,१०५.२५ रुपयांवर स्थिरावला. एलआयसी सध्या बाजार मूल्यानुसार पाचवी मोठी सूचीबद्ध कंपनी बनली असून इन्फोसिसपासून काही पावले दूर आहे. एलआयसीचा स्टॉक गेल्या तीन महिन्यांत ८०% आणि एका महिन्यात ३४% वधारला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *