देशभर आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ होती, त्यानंतर आता करदात्यांना आयटीआर रिटर्न भरण्यासाठी दंड भरावा लागत असून आता देशातील चॅरिटेबल ट्रस्टना (धर्मदाय संस्था) आयकर रिटर्न भरण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला आहे. धर्मादाय ट्रस्ट, धार्मिक संस्था आणि व्यावसायिक संस्थांसाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत एक महिना वाढवून ३० नोव्हेंबर केली असल्याचे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने १८ सप्टेंबर रोजी जाहीर केले.
या संस्थांसाठी आयकर भरण्यासाठी मुदत वाढ
प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, फॉर्म १०बी/१०बीबी मधील कोणताही निधी, ट्रस्ट, संस्था किंवा कोणत्याही विद्यापीठाने किंवा शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थेने २०२२-२३ साठी लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सादर करण्याची अंतिम तारीख देखील एक महिन्याने वाढवून ३१ ऑक्टोबर २०२३ करण्यात आली आहे.
राजकीय पक्ष, निवडणूक न्यास आणि संस्था आणि धर्मादाय व धार्मिक क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या व्यावसायिक संस्थांद्वारे ITR-7 दाखल केले जाते. सोमवारीच सरकारने सांगितले की कंपन्यांसाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून याशिवाय ज्या कंपन्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांना अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख एक महिन्याने वाढवून ३१ ऑक्टोबर करण्यात आली आहे.
रेकॉर्ड-ब्रेक आयकर फायलिंग
प्राप्तिकर विभागाच्या अलीकडच्या माहितीनुसार सप्टेंबरपर्यंत सुमारे ६.९८ कोटी करदात्यांनी आयकर भरले असून त्यापैकी सुमारे तीन कोटी करदात्यांना परतावाही जारी करण्यात आला आहे. याशिवाय मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी ३१ जुलैपर्यंत विक्रमी ६.७७ कोटी आयकर रिटर्न भरले गेले, ज्यापैकी ५३.६७ लाख करदात्यांना प्रथमच आयटीआर भरले. दरम्यान, जे करदाते ३१ जुलैपर्यंत ITR दाखल करू शकले नाहीत त्यांना डिसेंबरपर्यंत विलंबित ITR दाखल करण्याची संधी आहे.