विशाखापट्टनम: उपकर्णधार जसप्रीत बुमराहच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर गुंडळला. भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या असून टीम इंडियाला १४३ धावांची आघाडी मिळाली आहे. जसप्रीतने १५.५ षटकात ४५ धावा देत ६ विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने विकेट न गमावता २८ धावा केल्या होत्या. यशस्वी जयस्वाल १५ तर कर्णधार रोहित शर्मा १३ धावांवर खेळत आहेत. भारताची एकूण आघाडी १७१ धावांची झाली आहे. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने द्विशतक पूर्ण केले. त्यानंतर तो २०९ धावांवर बाद झाला. भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडच्या डावाची सुरुवात झाली. इंग्लंडला झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५९ धावा केल्या. बेन डकेटला कुलदीपने बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर इंग्लंडचा डाव सावरला नाही. नियमीत अंतराने इंग्लंडच्या विकेट पडत गेल्या. सलामीवीर झॅक क्रॉलीने सर्वाधिक ७६ धावा केल्या. अखेरच्या सत्रातील १० षटकांचा वेळ शिल्लक असताना इंग्लंडचा डाव २५३ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ६ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने ३ आणि अक्षर पटेलने १ विकेट घेतली. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांची डाळ शिजली नाही. बुमराहने बेन स्ट्रोक्सला बाद केले आणि भारताकडून चेंडूचा विचार करता सर्वात वेगाने १५० विकेट घेण्याचा टप्पा पार केला. त्याने ६ हजार ७८१ चेंडूत ही कामगिरी केली. याआधी हा विक्रम उमेश यादवच्या नावावर होता, त्याने ७ हजार ६६१ चेंडूत १५० विकेटचा टप्पा पार केला होता. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद शमी (७ हजार ७५५ चेंडू), ८ हजार ३७८ चेंडूंसह कपील देव चौथ्या तर ८ हजार ३८० चेंडूसह अर अश्विन पाचव्या स्थानावर आहे. इतक नाही तर सर्वात कमी डावात १५० विकेट घेण्याचा विक्रम बुमराहने स्वत:च्या नावावर केला. बुमराहने १५० विकेट फक्त ६४ डावात घेतले. याबाबत त्याने माजी कर्णधार कपील देव यांच्या ६७ डावात १५० विकेट घेण्याचा विक्रम मागे टाकला. कसोटीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याची बुमराहची ही १०वी वेळ आहे. दोन्ही संघातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आहे. आता दुसऱ्या कसोटीवर भारताची मजबूत पकड असून ही कसोटी जिंकून मालिका बरोबरीत करण्याची टीम इंडियाला संधी आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *