[ad_1]

दिगंबर शिंगोटे : कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेली आयपीएल लढत सुनील नारायणने आपल्या धमाकेदार खेळीने गाजवली. मात्र, त्याला तोलामोलाची साथ देणाऱ्या अंगक्रिश रघुवंशीनेही आपल्या नावावर एक विक्रम जमा केला आहे. तब्बल १६ वर्षांपूर्वीचा विक्रम त्याने आता मोडीत काढला आहे.

गेल्याच आठवड्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावांचा विक्रम रचला होता. आयपीएलमधील या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडण्याची संधी कोलकाता संघाला होती. मात्र, अखेरच्या षटकात आंद्रे रसेल बाद झाला आणि अखेर कोलकात्याला २७२ धावाच करता आल्या. आयपीएलमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच, एका सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने प्रथमच अठरा षटकार लगावले. कोलकाताने प्रथमच आयपीएलमध्ये अडीचशे धावांचा टप्पा पार केला. यापूर्वी, २०१८च्या मोसमात कोलकात्याने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध २४५ धावा केल्या होत्या. ही कोलकात्याची यापूर्वीची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या होती.

कोलकात्याने प्रथमच अडीचशे धावांचा टप्पा पार केला, यात सुनील नारायणचा मोठा वाटा होता. मात्र, त्याला तोलामोलाची साथ अंगक्रिश रघुवंशीने दिली. त्याने २७ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. यासह आयपीएलमधील आपल्या पहिल्याच खेळीत पन्नासहून अधिक धावा करणारा रघुवंशी (१८ वर्षे व ३०३ दिवस) सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला. याबाबतीत त्याने सोळा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. श्रीवत्स गोस्वामीने (१९ वर्षे व १ दिवस) आपल्या आयपीएल पदार्पणात बेंगळुरूकडून दिल्लीविरुद्ध खेळताना ५२ धावांची खेळी केली होती. याशिवाय आयपीएलमध्ये सर्वांत कमी वयात अर्धशतकांत रघुवंशी सातव्या क्रमांकावर आहे. याबाबतीत रियान पराग (१७ वर्षे व १७५ दिवस) अव्वल स्तानी आहे. त्यापाठोपाठ पृथ्वी साव (१८ वर्षे व १६९ दिवस आणि १८ वर्षे व १७७ दिवस), ऋषभ पंत (१८ वर्षे व २१२ दिवस), शुभमन गिल (१८ वर्षे व २३७ दिवस), ईशान किशन (१८ वर्षे व २९९ दिवस) हे फलंदाज आहेत.
या शिवाय रघुवंशीचा एक विक्रम थोडक्यात हुकला. त्याने २५ चेंडूंत अर्धशतक झळकावले.

आयपीएलमध्ये पहिल्या खेळीत वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा विक्रम जेम्स होप्सच्या नावावर आहे. त्याने २००८च्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना चेन्नईविरुद्ध २४ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. पण अंगक्रिशने या सामन्यात दमदार कामगिरी करत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे आता पुढच्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *