गडचिरोली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार ४०० पार’ म्हणत हॅट्रिक करण्यासाठी कंबर कसली असून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पूर्व विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या सर्वात लांब आणि भौगोलिकदृष्ट्या अतिशय विस्तीर्ण असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सलग दोनदा निवडून आलेले भाजपचे खासदार अशोक नेते यांचाही मोदींसोबत हॅट्रिक करण्याचा मानस असताना महायुतीमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे दिल्ली गाठण्याच्या प्रयत्नांत असून अनुसूचित जमातीच्या (एसटी) उमेदवारासाठी राखीव असलेल्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघावर दावा केला असून अजित पवार गट यासाठी प्रयत्न करत आहे. किंबहुना तशी मागणी देखील केल्याने आता लोकसभा निवडणुकांपूर्वीच जागा वाटपावरून महायुतीत घमासान होणार असल्याचे चित्र दिसत असल्याने उमेदवार निवडताना पक्षश्रेष्ठींचीही कसोटी लागणार आहे. इकडे महाविकास आघाडीत देखील इच्छुकांची दाट गर्दी आहे.

मतदारसंघाची रचना कशी आहे?

चंद्रपूरमधून गडचिरोली विभक्त होऊन स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर २००९ मध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र अस्तित्वात आले. हा मतदार संघ भौगोलिक दृष्ट्या अतिशय विस्तीर्ण असून हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (एसटी) उमेदवारासाठी राखीव आहे. गडचिरोलीतील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी असे तीन तसेच चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी, चिमूर व गोंदियातील आमगाव अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचे मिळून लोकसभा क्षेत्र तयार झाले आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा : अकोला लोकसभेत भाजपचे धक्कातंत्र, प्रकाश आंबेडकरांना कोण टक्कर देणार?
काँग्रेसचे मारोतराव कोवासे हे या मतदारसंघाचे पहिले खासदार. त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये सलग दोन वेळा भाजपने मुसंडी मारली असून अशोक नेते हे दोन टर्म पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ (गडचिरोली, आरमोरी, अहेरी, चिमूर) महायुतीकडे तर दोन विधानसभा मतदारसंघ (ब्रह्मपुरी,आमगाव) महाविकास आघाडीकडे आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत यावेळी लोकसभेला महाविकास आघाडी व महायुतीची तगडी फाईट होईल.

अजित पवार गटामुळे भाजपची समीकरणे उलटी सुलटी, वंचितची देखील ताकद

लोकसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले असून महायुतीत अजित पवार गटाचा राष्ट्रवादी पक्ष सामील झाल्याने उमेदवारीच्या दावेदारीत नवीन भर पडली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षच प्रबळ दावेदार आहे. गतवेळी वंचित बहुजन आघाडीने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवून ताकद दाखवून दिली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात यावरही समीकरण अवलंबून राहणार आहे.

मात्र, तत्पूर्वी महायुतीमधील भाजपचे विध्यमान खासदार अशोक नेते हे सलग दोनदा निवडून आले असून पंतप्रधान मोदींसोबत हॅट्रिक करण्याचा त्यांचा विचार सुरू आहे. तर दुसरीकडे महायुतीतील अजित पवार गटाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जाते. त्याअनुषंगाने अजित पवार गटाची मागणी देखील सुरू आहे. त्यामुळे भाजप गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची जागा सहजपणे दुसऱ्यांसाठी सोडणार नाही आणि आपणच पुढचे उमेदवार असल्याचे खासदार अशोक नेते सांगतात. त्यामुळे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात उमेदवारी साठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा : नागपुरात RSS चं मुख्यालय आणि गडकरींसारखा खासदार, काँग्रेसचं काय होणार? कोण उमेदवार असणार? वाचा..
कुठे कुणाची ताकद?

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षच प्रबळ दावेदार असला तरी इथेही अनेकजण गुडघ्याला बाशिंग तयार असल्याने इच्छुकांच्या भाऊ गर्दीत उमेदवारी कोणाला मिळते याची उत्सुकता आहे. सलग दोनदा भाजपचे उमेदवार निवडून आल्याने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसला अच्छे दिन येणार अशी आशा बाळगण्यात येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली दोन विधानसभा क्षेत्र वगळता अहेरी विधानसभेत काँग्रेसची फारशी पकड नव्हती. मोदी लाट असताना अमित शाहांसारखे नेते प्रचारासाठी आले असतानाही या विधानसभेवर धर्मराव बाबा आत्राम निवडून आले आणि त्यांनी भाजपसह कॉंग्रेसचाही सुपडा साफ केला. त्यांचे पुतणे अमरीशराव आत्राम यांच्यामुळे भाजपचे अस्तित्व असले तरी काँग्रेस बॅकफूटवर गेले. मात्र, आदिवासी विध्यार्थी संघटनेचे नेते माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गळाला लावले. त्यांची अहेरी विधानसभेत चांगली पकड आहे. अजय कंकडालवार यांच्यामुळे काँग्रेसला बळ मिळाले आहे. काँग्रेसमध्येही माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ नितीन कोडवते हे प्रामुख्याने इच्छुक आहेत.

वेध लोकसभा निवडणुकीचा : यंदा शेकापचं टॉनिक नाही, तटकरेंचा कस लागणार, गीते पुन्हा मैदानात, रायगडमध्ये काय होईल?
आदिवासीबहुल भागातील निर्णायक मते

राज्याचा वनाच्छादित,आदिवासी, नक्षलग्रस्त अशी शेलकी विशेषणे लाभलेल्या या टोकावरच्या भागाकडे देशाचेच काय राज्याचेही कायम दुर्लक्ष होते. वैनगंगा, गोदावरी, गाढवी, पर्लकोटा, इंद्रावती या बारमाही नद्या, सिंचन मात्र शून्य… मूळ चंद्रपूर जिल्ह्यापासून १९८० साली वेगळ्या झालेल्या या जिल्ह्यात आता कुठे विकासाचे वारे वाहू लागलेत. मात्र जंगल, आदिवासी अशी ओळख असलेला हा प्रदेश वनोपज उत्पादने व थोडीफार भातशेती या जोरावर पुढे येऊ पाहतो आहे. हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती अर्थात आदिवासींसाठी राखीव आहे. गडचिरोली, ब्रह्मपुरी व वडसा अशी तीन मोठी शहरे व उर्वरित ग्रामीण अशी या मतदारसंघाची रचना आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात २००९ मध्ये १२,८५,३८७ मतदार होते. यात २०१४ च्या निवडणुकीत भर पडली असून या मतदार संघात एकूण १५ लाख ६८ हजार ६२० मतदार आहेत. यात पुरुष संख्या ७ लाख ९४ हजार ७६८ तर स्त्रियांची संख्या ७ लाख ७३ हजार ८५० मतदार आहेत. मागील २०१४ च्या निवडणुकीचा तुलनेत ४१ हजार ६३० मतदार वाढले आहेत. यंदाही आकडे वाढणार आहे.

गडचिरोली लोकसभा मतदारसंघ आदिवासी बहुल आहे. याशिवाय टक्केवारीत १५ टक्के ओबीसी, ५० हजार मुस्लिम, सुमारे १ लाख तेलुगू भाषिक आहेत. पुनर्वसित बंगाली मतदारांची संख्याही निर्णायक आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा : ठाकरेंचे पाठीराखे संजय जाधव यांचा कस लागणार, महायुतीत ‘रेस’, परभणीत चित्र काय?
भावनिक मुद्दे आणि नक्षलवाद

गडचिरोली नुसते नाव उच्चारले तरी विदर्भाबाहेरील लोकांचा थरकाप उडतो. देशातील सर्वात मागास जिल्ह्याच्या यादीत अग्रक्रमावर असलेला हा भाग आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया, तसेच आजही विकासापासून दूर आणि समस्यांनी ग्रासलेले आदिवासी ही इथली कथा.. इथले आदिवासी हेच विविध राजकीय पक्षांची राजकीय शक्ती… मराठी, हिंदी, गोंड, माडिया आणि तेलगु या भाषा सर्रास प्रचलित असणारा हा भाग विदर्भ छत्तीसगडसह तेलंगणाचा संस्कृतीसंगम आहे. विदर्भाची ‘काशी’ अशी श्रद्धा असणारे हेमाडपंथी मार्कंडा मंदिर आणि चिमूर येथील क्रांतीस्थळ या भागातील भावनिक मुद्दे. लोकशाहीच्या मार्गाने जाण्याची इच्छा असूनही माओवादी बंदुकीचा धाक अशा गर्तेत इथले लोक सापडले आहेत.

वेध लोकसभा निवडणुकीचा : तीन राज्यांच्या विजयाने मनोबल उंचावले तरी भाजपसाठी सोपी नसेल पुणे लोकसभा!
या मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो?

*** २०१९ मधील मतांची आकडेवारी

अशोक नेते – भाजप – ५ लाख १९ हजार ९६८
डॉ. नामदेव दल्लूजी उसेंडी (काँग्रेस) ४ लाख ४२ हजार ४४२
डॉ. रामेशकुमार बाबुरावजी गजबे – वंचित बहुजन आघाडी – १ लाख ११ हजार ४६८
हरिचंद्र नागोजी मंगम (बसपा) २८ हजार १०४
नोटा – २४ हजार ५९९
मतदानाची टक्केवारी ७२.३३ टक्के

*** २०१४ मधील मतांची आकडेवारी

अशोक नेते (भाजप) ५ लाख ३५ हजार ६१६
डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस) २ लाख ९८ हजार ९७६
रामराव नन्नावरे (बसपा) ६६ हजार ८७७
नोटा – २४ हजार ४७९
मतदानाची टक्केवारी – ७०.०४ टक्के

*** २००९ मधील मतांची आकडेवारी

मारोतराव कोवसे (काँग्रेस) ३ लाख २१ हजार ७५६
अशोक नेते (भाजप) २ लाख ९३ हजार १७६
राजे सत्यवानराव आत्राम (बसपा) १ लाख ३५ हजार ७५६
दिनेश तुकाराम मडावी (अपक्ष) २५ हजार ८५७
मतदानाची टक्केवारी ६५.१४ टक्केSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *