यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आज राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या उपोषणस्थळी आले आहेत. मराठा समाजाला एकनाथ शिंदेंच न्याय देऊ शकतात, ही माझी भावना आहे. ते आज इथे आलेत म्हणून मी ही गोष्ट म्हणत नाही. पण ते आरक्षण देतील, हा माझा विश्वास आहे. शासनाची मागणी होती की, आम्हाला एक महिन्यांचा वेळ द्या. आपण त्या पद्धतीने एक महिन्यांचा वेळ दिला आहे. ३१ व्या दिवशी सरकार आपल्या मराठ्यांना कुणबी दाखले देईल, असा विश्वास आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
जरांगे पाटील यांच्या वडिलांनाही मुख्यमंत्र्यांनी पाजला ज्यूस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आल्यावर जरांगे पाटील यांचे वडिलही मंचावर आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांची ख्यालीखुशाली विचारली. मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस दिल्यावर मुख्यमंत्र्यानी जरांगे पाटलांच्या वडिलांनाही ज्यूस दिला.
समाजबांधवांनो टोकाचं पाऊल उचलू नका; जरांगे-पाटलांचं आवाहन
मराठा आरक्षणाची लढाई यशस्वी केल्याशिवाय मी माघार घेणार नाही. माझा बाप अजूनही कष्ट करतो, मी त्याच्या कष्टाची जाणीव ठेऊन मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप मी कधीच सहन करणार नाही, असं सांगताना मराठा समाजबांधवांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.