[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘संयुक्त कुटुंब पद्धत लोप पावत असल्याने आज कुटुंबातील सदस्यांकडून ज्येष्ठांची पुरेशी काळजीच घेतली जात नाही. म्हणूनच अनेक वयोवृद्धांचे हाल होत आहेत. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत त्यांच्या नशिबी एकाकी जगणे येत आहे. विशेषत: विधवा वृद्ध महिलांचे अधिक हाल होत आहेत’, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणाच्या निकालात नोंदवले. वयोवृद्ध आईला बेघर करणाऱ्या मुलाला व त्याच्या पत्नीला दणका देत १५ दिवसांच्या आत आईचे घर रिकामी करण्याचा आदेश न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने दिला.

दिनेश चंदनशिवे यांनी त्यांची आई लक्ष्मी चंदनशिवे यांच्याविरोधात याचिका केली होती. ‘माझ्या पतीचे २०१५मध्ये निधन झाल्यानंतर मुलगा दिनेश व त्याची पत्नी मला मुलुंडमधील माझ्या घरी भेटायला आले. मात्र, नंतर ते घरातून गेलेच नाहीत. उलट माझीच छळवणूक करून त्यांनी मला घर सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर मला ठाण्यातील माझ्या मोठ्या मुलाकडे जाऊन राहणे भाग पडले’, अशी कैफियत लक्ष्मी यांनी मांडल्यानंतर आधी उपविभागीय अधिकारी यांनी आणि नंतर ज्येष्ठ नागरिक देखभाल लवादाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला होता.

दिनेश यांना घर रिकामी करून आईच्या ताब्यात देण्याचा आदेश देण्यात आला होता. त्याला दिनेश यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ‘घर माझ्या पालकांच्या मालकीचे असल्याने त्यात माझाही हक्क आहे’, असा त्यांचा युक्तिवाद होता. मात्र, पालकांपैकी कोणीही हयात असेपर्यंत मालमत्तेत मुलाचा हक्क प्रस्थापित होत नाही, असे स्पष्ट करून खंडपीठाने सुनावणीअंती ही याचिका मंगळवारी फेटाळून लावली. १५ दिवसांच्या आत घर रिकामी करून लक्ष्मी यांच्या ताब्यात देण्याचा आदेश मुलगा व सुनेला देतानाच त्या घराबाबत कोणत्याही त्रयस्थाशी व्यवहार करण्यास खंडपीठाने त्यांना मनाई केली.

‘कोणत्याही पालकाला असे भोगावे लागू नये’

‘एखाद्याच्या आयुष्यात भौतिक गोष्टींपेक्षाही अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपली मुले स्वत:च्या पायावर उभे राहून सर्व आघाड्यांवर यश मिळवतात आणि आपल्या पालकांच्या संपत्तीकडे पाहतही नाहीत, हे पाहिल्यानंतर काही पालकांना अभिमान वाटतो. मात्र, दुर्दैवाने न्यायालयात अनेक अशी प्रकरणे येत आहेत, ज्यातून हे जग आदर्शवत नसून माणसाच्या लोभाला अंतच नसल्याचे समोर येत आहे. वयोवृद्ध महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिच्या मुलांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी (मोठ्या मुलग्याचा अपवाद वगळता) तिला प्रेम व माया देण्याऐवजी आणि तिची काळजी करण्याऐवजी तिला कायदेशीर लढाई लढण्यास भाग पाडले जाते, ही या मातेची अत्यंत दुर्दैवी कहाणी आहे. कोणत्याही पालकाला असे भोगावे लागू नये’, असेही खंडपीठाने आपल्या निर्णयात नमूद केले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *