मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची शुक्रवारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दहिसर पश्चिमेला असलेल्या आयसी कॉलनीत त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाईनं अभिषेक यांची हत्या केली. त्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडली आणि आत्महत्या केली. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.२०२२ मध्ये मॉरिसविरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाली. त्या प्रकरणात त्याला गेल्या वर्षी अटक झाले. काही महिने तो तुरुंगात होता. त्यानंतर तो बाहेर आला. करोना काळात त्यानं अनेक गरजूंना मदत केली होती. त्याआधारे निवडणूक लढवण्याचा त्याचा मानस होता. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ किंवा ९ मधून लढण्यासाठी तो उत्सुक होता. जेलमधून सुटल्यानंतर त्यानं राजकीय पक्षांशी संपर्क साधला. पण बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झाली असल्यानं कोणताही पक्ष त्याला तिकीट देण्यास तयार नव्हता.आपल्याविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवणाऱ्या महिलेला अभिषेक घोसाळकरांचं पाठबळ असल्याचा मॉरिसचा समज होता. अभिषेक यांच्यामुळेच आपलं राजकीय करिअर सुरू होण्यापूर्वीच संपल्याचं त्याला वाटत होतं. त्यामुळे त्याच्या मनात तीव्र संताप होता. पण काही महिन्यांपूर्वी त्याचा पवित्रा अचानक बदलला. त्यानं अभिषेक यांच्याशी जवळीक साधली. त्यांचा विश्वास संपादन केला.शुक्रवारी त्यानं अभिषेक यांना आयसी कॉलनीत असलेल्या त्याच्या कार्यालयात एका कार्यक्रमासाठी बोलावलं. आपल्यातलं वितुष्ट संपल्याची माहिती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीरपणे देऊ असं त्यानं अभिषेक यांना सांगितलं. अभिषेक यांनी तयारी दर्शवताच मॉरिस त्यांना कार्यालयात घेऊन गेला. लाईव्ह सुरू असल्यानं अभिषेक यांचे कार्यकर्ते बाहेरच थांबले. जवळपास चार मिनिटं अभिषेक आणि मॉरिस लाईव्ह होते. त्यानंतर मॉरिसनं अभिषेक यांच्यावर अचानक ४ ते ५ गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत:वरही गोळ्या झाडली.मॉरिसनं हत्या आणि आत्महत्येसाठी वापरलेलं पिस्तुल त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचं आहे. तो पोलिसांच्या अटकेत आहे. पोलिसांनी मॉरिसचा फोन अनलॉक केला आहे. मॉरिसनं अनेकांसोबतचे बरेचसे चॅट डिलीट केले आहेत. ते पुन्हा मिळवण्यासाठी पोलीस तांत्रिक मदत घेत आहेत. अभिषेक यांना संपवण्याची माहिती मॉरिसनं कोणाला दिली होती का, त्याचमुळे त्यानं चॅट डिलीट केले होते का, याचा शोध पोलीस घेत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *