[ad_1]

म.टा प्रतिनिधी, नवी दिल्ली: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सोमवारपासून (१८ सप्टेंबर) शुक्रवारपर्यंत (२२ सप्टेंबर) बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सध्याच्या ऐतिहासिक संसद भवनाचा स्वातंत्र्यानंतरचा ७५ वर्षांचा प्रवास, जी-२० परिषदेतील भारताचे यश, चांद्रयान-३ आदींवर विशेष चर्चा, भारताच्या लोकशाहीचा नवीन संसद भवनातील वास्तुप्रवेश, सतराव्या लोकसभेतील खासदारांचे संस्मरणीय फोटोसेशन व काही विधेयकांना प्रस्तावित मंजुरी ही या अधिवेशनाची ढोबळमानाने चतुःसूत्री असेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे. स्वातंत्र्यापासूनचे हे आठवे विशेष अधिवेशन असेल.

संसदीय सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसदेवर तिरंगा फडकवण्यात येणार आहे. संसदेचे अधिवेशन बोलवण्यासाठी कोणतीही निश्चित संसदीय दिनदर्शिका घटनाकारांनी आखून दिलेली नाही. परंतु परंपरेनुसार सरकार एका वर्षात अर्थसंकल्पीय, पावसाळी आणि हिवाळी अशी तीन अधिवेशने आयोजित करते. याबाबत सन १९५५मध्ये पंडित नेहरू यांनी स्थापन केलेल्या एका समितीने संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ फेब्रुवारी ते ७ मे, पावसाळी अधिवेशन १५ जुलै ते १५ सप्टेंबर आणि हिवाळी अधिवेशन ५ नोव्हेंबर किंवा दिवाळीचा चौथा दिवस झाल्यावर यापैकी घेण्याचा प्रस्ताव दिला होता. तो तंतोतंत पाळला गेलेला नाही. मात्र संसदेच्या दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे, असे घटनेत स्पष्टपणे नमूद केले आहे.

संसदेचे ‘विशेष अधिवेशन’ या शब्दाचा राज्यघटनेतही उल्लेख नाही. परंतु केंद्र सरकार सामान्यत: महत्त्वाच्या- आणीबाणीच्या परिस्थितीत राष्ट्रपतींच्या आदेशाने अशी अधिवेशने बोलावू शकते.

NDA चा आधार, अंहकाराचे दोन I ; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात

आतापर्यंत संसदेची सात विशेष अधिवेशने बोलावण्यात आली आहेत.

– सन १९७७मध्ये तमिळनाडू आणि नागालँडमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवण्यासाठी फेब्रुवारीत दोन दिवस (फक्त) राज्यसभेचे विशेष अधिवेशन घेण्यात आले.

– सन १९९१मध्ये, हरयाणात राष्ट्रपती राजवटीला मान्यता देण्यासाठी जूनमध्ये दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते.

– सन १९९२मध्ये भारत छोडो आंदोलनाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त तत्कालीन पी. व्ही. नरसिंह राव सरकारने विशेष अधिवेशन बोलावले होते.

– सन १९९७मध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी २६ रोजी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

– सन २००८मध्ये डाव्या पक्षांनी अणुकराराचे कारण काढून डॉ. मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्या जुलैमध्ये सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावले होते.

– २६ नोव्हेंबर २०१५ रोजी मोदी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती साजरी करण्यासाठी विशेष अधिवेशन घेतले.

– अप्रत्यक्ष करप्रणालीत सुधारणा करून वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंमलात आणण्यासाठी मोदी सरकारने सन २०१७मध्ये विशेष अधिवेशन बोलावले होते.

पगार १० हजार असला तर पोरांच्या हातात किती येणार? कंत्राटी धोरण युवकांच्या मुळावर, रोहित पवारांची ‘आकडेमोड’

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *