मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील खदखद पुन्हा समोर येऊ लागली आहे. या अगोदरही अनेकांनी पक्षांतर्गत गटबाजीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचा फटका बसू नये, याकरिता पक्षाचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्निथला यांनी रविवारीच पदाधिकाऱ्यांचे कान टोचले असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. मुंबईत झालेल्या बैठकीसह पश्चिम उपनगरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी अंतर्गत मतभेद विसरून एकत्र काम करण्याची सूचना केल्याचे समजते. चेन्निथला पुन्हा मुंबईत येत असून आज, मंगळवारी दुपारी २ वाजता त्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक होणार आहे.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर येत्या काळात मुंबई काँग्रेसला जोरदार धक्का बसेल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात वर्तविली जात होती. त्यासाठी आगामी राज्यसभा निवडणुकीचा मुहूर्त साधला जाईल, हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रभारी चेन्निथला मैदानात उतरल्याची चर्चा सुरू होती. त्याच अनुषंगाने गेल्या दोन दिवसांपूर्वीच ते चेन्निथला मुंबईच्या दौऱ्यावर होते. यात त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या कोअर कमिटी सदस्यांची बैठक घेतली होती. यात पक्षाच्या आगामी रणनीतीबाबत चर्चा करताना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केल्याची माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्याचवेळी पश्चिम उपनगरात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही चेन्निथला यांनी अतंर्गत गटबाजी थांबवून आगामी निवडणुकीसाठी कामाला लागण्याची सूचना कार्यकर्त्यांना केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

घटक पक्षांबाबत निरूपम यांची नाराजी

काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय निरूपम यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांबाबत नाराजी व्यक्त केली. आघाडीचा धर्म पाळण्याची सूचना आम्हाला केली जाते. मात्र इतर पक्ष आघाडीचा धर्म पाळत नसल्याची खंत त्यांनी चेन्निथला यांच्यासमोर बोलून दाखवली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *