भारत आणि न्यूझीलंड यावेळी २०१९ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये आमने सामने आले होते. त्यावेळीही भारतीय संघ भन्नाट पॉर्मात होता. पण त्या सेमी फायनलमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. आता चार वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि न्यूझीलंड पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. पण यावेळी भारतीय संघ आपल्या मैदानात खेळत असल्यामुळे त्यांच्यावर जास्त दडपण असेल, असे म्हटले जात आहे. पण रोहितने या सर्व गोष्टींचा फक्त एका वाक्यात समाचार घेतला आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, ” हा वर्ल्ड कप आहे. वर्ल्ड कपचा साखळी सामना असो किंवा सेमी फायनल तुमच्यावर दडपण हे असणारच. त्यामुळे हे दडपण कसे हाताळचे, हे सर्वात महत्वाचे आहे. आम्ही वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ९ सामने खेळलो. ९ पैकी ९ सामन्यांत आम्ही विजय मिळवला आहे. त्यामुळे आतापर्यंत आम्ही हे दडपण चांगल्या पद्धतीने हाताळले आहे. त्यामुळे आम्हाला वेगळं काहीच करण्याची गरज नाही. जे आम्ही आतापर्यंत केले आहे, तेच आम्ही केले तरी पुरेसे आहे. काही जणांना वाटते की, आम्ही घरच्या मैदानात खेळत असल्यामुळे आमच्यावर सर्वात जास्त दडपण असेल. पण ही गोष्ट तेवढी योग्य वाटत नाही. ही गोष्ट आम्हाला लागू पडत नाही. कारण आम्ही आमच्या देशात खेळत असलो तरी आम्हाला नेमकं काय करायचं आहे, ते आम्हाला चांगलेच माहिती आहे. मैदानात चाहते आम्हाला पाठिंबा देत असतात आणि त्यांच्या आमच्याकडून मोठ्या अपेक्षाही असतात. पण या सर्व गोष्टी कशा हाताळायच्या हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. आम्ही जे आतापर्यंत केलं तेच उर्वरीत दोन सामन्यांमध्ये करायचे आहे, अजून काही वेगळं करण्याची आम्हाला गरज नाही.” केन विल्यमसननने सेमी फायनलमध्ये भारतावर जास्त दडपण असेल, असे म्हटले होते. पण त्याचा चांगलाच समाचार रोहितने घेतला आहे. त्याचबरोबर सेमी फायनलमध्ये आम्हाला काय करायचे आहे, हे आम्हाला माहिती आहे, असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या रोहितने न्यूझीलंडला वॉर्निंग दिली आहे. त्यामुळे आता मैदानात हा सामना कसा रंगतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्यापूर्वी दोन्ही कर्णधारांनी आपली मते व्यक्त केली आहेत. पण आता मैदानात कोणता संघ बाजी मारतो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असेल.