तिरुअनंतपुरम: अवघ्या ३४ हजार रुपयांत पोलीस निरीक्षक तुमच्या सुरक्षेला, तोही एका प्रशिक्षित कुत्र्यासोबत. एका दिवसासाठी पोलीस ठाणं तुमचं. मग त्यात तुम्ही काहीही करा. तुम्हाला एक दिवस कोणीच रोखणार नाही. कदाचित या सगळ्या गोष्टी तुम्ही मस्करीत घ्याल. पण हे सगळं शक्य आहे. पोलिसांनी आणलेल्या एका योजनेत हे सर्व होऊ शकतं. पोलीस दलातील प्रशिक्षित कुत्रे, पोलीस कर्मचारी, इतकंच काय तर संपूर्ण पोलीस ठाणं तुम्ही पैसे मोजून तुमच्या दिमतीला ठेऊ शकता. केरळ सरकारच्या आदेशातून ‘रेट कार्ड’ समोर आलं. सर्कल निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला कामावर ठेवण्यासाठी प्रति दिवस ३,०३५ ते ३,३४० रुपये मोजावे लागतील. यापेक्षा कमी पैसे मोजायचे असल्यास सिव्हिल पोलीस अधिकाऱ्याची सेवा घेऊ शकता. त्यासाठी ६१० रुपये द्यावे लागतील. पोलीस दलातील प्रशिक्षित कुत्र्यासाठी प्रति दिवस ७,२८० रुपये मोजण्याची तयारी व्हावी. वायरलेस उपकरणं १२,१३० रुपयांमध्ये दिवसभर भाड्यानं नेऊ शकता. तर पोलीस ठाणं भाड्यानं घेण्यासाठी १२ हजार रुपये लागतील.एक पोलीस ठाणं आणि पोलीस वायरलेस यांचं भाडं जवळपास सारखं आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या तुलनेत कुत्र्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. भाड्यासाठी अशी रक्कम का, त्यामागचं नेमकं कारण काय, याबद्दलची माहिती सरकारी आदेश देण्यात आलेली नाही. चित्रीकरण, मनोरंजन आणि खासगी पार्ट्यांचा विचार करुन सरकारनं हा आदेश काढला आहे.सरकारी आदेशावर काही पोलीस अधिकारी नाराज आहेत. वास्तवातील परिस्थिती विचारात न घेतला हा आदेश काढण्यात आल्याचा एक मतप्रवाह पोलीस दलात आहे. ‘चित्रपट कंपन्या आणि खासगी कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्या श्रीमंतांकडे त्यांची संसाधनं असतात. त्यांना पोलीस आणि त्यांची उपकरणं भाड्यानं घेण्याची गरज नसते. सरकारी कर्मचारी आणि सरकारी संपत्ती भाड्यानं देणं नैतिकतेला कितपत धरुन आहे?’, असा प्रश्न काही पोलिसांनी खासगीत व्यक्त केला. वायरलेस सेट आणि पिस्तुलांसोबत पोलिसांना कामावर ठेवणं सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चिंताजनक असल्याचंही काही पोलीस अधिकारी म्हणाले.