[ad_1]

हैदराबाद: हेल्मेटचा वापर वाढवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अनेकदा जनजागृती केली जाते. मात्र तरीही अनेक जण हेल्मेटचा वापर करत नाहीत. हातात, बाईकच्या हँडलला हेल्मेट अडकवणाऱ्यांची आणि वाहतूक पोलीस दिसताच ते डोक्यावर चढवण्याची घाई करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ही मंडळी हेल्मेटचा वापर स्वत:च्या सुरक्षेपेक्षा दंड वाचवण्यासाठी करतात. त्यामुळे हेल्मेटचा वापर वाढावा यासाठी प्रशासनाकडून वारंवार जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातात. तेलंगणाच्या जगतील जिल्ह्यातील बीरपूरमधील सरकारी कर्मचारी मात्र त्यांच्या कार्यालयांमध्येही हेल्मेट घालतात.

बीरपूरमध्ये असलेल्या मंडल परिषद विकास कार्यालयात काम करणारे सर्व कर्मचारी हेल्मेट घालूनच काम करतात. कार्यालयात पाऊल टाकल्या टाकल्या सगळे कर्मचारी डोक्यावर हेल्मेट चढवतात आणि मगच त्यांच्या खुर्चीवर जाऊन काम सुरू करतात. कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्यांना याबद्दल कुतूहल वाटतं. हेल्मेटबद्दलच्या जनजागृतीसाठी सरकारनं नवी मोहीम हाती घेतली असावी असा त्यांचा समज होतो. मात्र इथली परिस्थिती पूर्णत: वेगळी आहे.

तेलंगणाच्या बीरपूरमधील एमपीडीओचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार्यालयाची दुर्दशा झाल्यानं, बांधकाम कोसळण्याचा धोका असल्यानं सरकारी कर्मचारी हेल्मेट घालून काम करत आहेत. एमपीडीओचं कार्यालय पडण्याच्या स्थितीत आहे. कर्मचारी जीव मुठीत धरुन काम करत आहेत. कार्यालयाचं छत, भिंती कोसळण्याची भीती आहे. अनेकदा वरिष्ठांना सांगूनही कार्यालयाची दुरुस्ती होत नाही. कर्मचाऱ्यांना दुसरी जागाही उपलब्ध करुन दिली जात नाही. त्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालून कामाला येण्यास सुरुवात केली आहे.

कार्यालयाची अवस्था बिकट आहे. पण सर्वसामान्य माणसांची कामं होणं गरजेचं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालून काम सुरू केलं आहे. या माध्यमातून कार्यालयाच्या दुरावस्थेकडेही लक्ष वेधलं गेलं आहे. कार्यालय पडायच्या अवस्थेत असतानाही कर्मचाऱ्यांचं काम अव्याहतपणे सुरू आहे. त्यात कोणताही खंड पडलेला नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *