‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी टोकाचे आंदोलन न करता, आरक्षणात १६ टक्यांची अधिक वाढ करून मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकालात काढावा. मराठा समाजातील गरजू, गरीब घटकांना आरक्षणाच्या माध्यमातून जगण्याचा अधिकार मिळवून द्यावा,’ अशी मागणी पवार यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय केंद्रातील विद्यमान सरकारने कायदा करून बदलले आहेत. केंद्र सरकारकडे तो पर्यायसुद्धा उपलब्ध असल्याचे पवार म्हणाले. मात्र काही लोकांना हा प्रश्न सोडवायचा नसून, या प्रश्नांचे घोंगडे त्यांना भिजत ठेवायचे आहे. मराठा समाजाला त्यांच्या न्याय हक्काचे आरक्षण मिळायला हवे असे काहींना वाटते का, हेसुद्धा तपासून पाहिले पाहिजे असेही ते म्हणाले.
मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी मुंबईतून फोन गेले होते, त्यानुसार कारवाई झाली, असा आरोप करून, ही कारवाई केली म्हणून आपण शिक्षाही भोगली हे त्यांनी आपल्याला सांगितल्याचा पुनरुच्चार पवार यांनी केला. यामागे जाणीवपूर्वक कारस्थान असल्याची अनेकांनी शंका व्यक्त केली आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. ‘पक्ष आणि चिन्हाची चिंता करू नका. आपण लोकांमध्ये राहायला हवे. आपण लोकांमध्ये राहिलो तर पक्ष आणि चिन्हाची गरज नसते. मी स्वत: सहा निवडणूका वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आणि जिंकलोसुद्धा,’ असा अनुभव सांगून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.
कुळवाडीभूषणवरून वाद नको…
मराठा समाजास आरक्षण देताना गरिबाच्या ताटातील भाकरी काढण्याची गरजच नाही. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला होता. कुळवाडीभूषण असा त्यांनी महाराजांचा उल्लेख केला होता. इतकी वर्षे लोकांनी हे विशेषण स्वीकारले. आज यावरून कशाला वाद करायचा, असेही पवार म्हणाले.