पुणे : उपमुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आणखी काही दिवस विश्रांती करणार असून पवार कुटुंबाच्या दिवाळीसाठी अजित पवार बारामतीला जाणार नाहीत असं कालच त्यांच्या कार्यालयाने सांगितले होते. मात्र आज तब्येतीचं कारण बाजूला सारून त्यांनी चक्क पुण्यात यांची भेट घेतली. पुण्यातील बाणेरमध्ये शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि इतर कुटुंबिय एकत्र आले होते. या भेटीनंतर आणि गप्पांनंतर अजित पवार विशेष विमानाने थेट दिल्लीला रवाना झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.राष्ट्रवादीतल्या पक्ष फुटीनंतर दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. निवडणूक आयोगातल्या सुनावणीदरम्यान दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर खालच्या भाषेत टीका करत आहेत. असं सगळं असताना मात्र दुसरीकडे कार्यक्रमांतून अजित पवार आणि शरद पवार एका व्यासपीठावर येत आहेत. सहकारी संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये भेटी होत आहेत, या भेटींदरम्यान चर्चा होतायेत. संवादाची दारं कुठेही बंद झालेली नाहीयेत. आजही सकाळी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर काही वेळांतच अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली.सकाळी दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीमध्ये दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. वळसे पाटील यांच्या भेटीनंतर शरद पवार प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी गेले. तिथे प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार, सुनेत्रा पवार यांच्यात भेट झाली. या सर्वांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्यानंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत गेल्यानंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अमित शहा यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार डेंग्यूमुळे आजारी असल्याने सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेले नाहीयेत. दुसरीकडे अजित पवार नाराज असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. अशातच अजितदादांनी पवारांची भेट घेतल्याने पुन्हा राजकारणात काही उलथापालथ होतेय का? अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.