लखनऊ: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं कहर केला. पहिल्या ४ सामन्यांत संधी न मिळालेल्या शमीला हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर संघात स्थान मिळालं. संघात स्थान मिळताच त्यानं चमक दाखवली. ६ सामन्यांत २३ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणारा शमी यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज आहे. त्यानं तीन सामन्यांमध्ये पाच किंवा त्याहून अधिक फलंदाजांना माघारी धाडलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं ७ गडी टिपले आणि भारतानं अंतिम फेरी गाठली.विश्वचषक स्पर्धेत आपल्या गोलंदाजीनं खळबळ उडवून देणाऱ्या शमीला योगी सरकारनं गिफ्ट दिलं आहे. शमीच्या गावात स्टेडियम उभारण्यात येणार आहे. अमरोहाचे जिल्हाधिकारी राजेश त्यागी यांनी शमीचं गाव असलेल्या सहसपूर अलीनगरमध्ये मिनी स्टेडियम आणि ओपन जिम उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.अमरोहाचे जिल्हाधिकारी राजेश त्यागी आणि मुख्य विकास अधिकारी यांच्या नेतृत्त्वात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची टीम मोहम्मद शमीच्या गावी गेली होती. शमीच्या गावातील रहिवाशांना प्रेरणा मिळावी यासाठी स्टेडियम आणि ओपन जिमची उभारणी करण्यात येणार आहे. जमिनीचा शोध घेण्यासाठी अधिकारी सहसपूरला पोहोचले. इथे १७ एकर जमिनीवर स्टेडियम उभारलं जाईल.शमीच्या गावात मिनी स्टेडियम तयार करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. गावात ओपन जिमदेखील सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सरकार २० मिनी स्टेडियमची उभारणी करणार आहे. यातलं एक अमरोहामध्ये असेल. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला शमी त्याच्या उमेदीच्या काळात राज्यात फारशा संधी नसल्यानं पश्चिम बंगालला गेला. तिथे त्याला चांगल्या संधी मिळाल्या. या संधीचं त्यानं सोनं केलं.