वृत्तसंस्था, पाटणा

बिहारमधील जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी तब्बल आठ तास चौकशी केली. तेजस्वी यांचे वडील आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सोमवारी तब्बल नऊ तास चौकशी केली होती.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव हे मंगळवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी ईडीच्या कार्यालयात पोहोचले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते बाहेर पडले. ईडीने १९ जानेवारी रोजी यादव पिता-पुत्रांना चौकशीसाठी समन्स बजावले होते.

दरम्यान, भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला विरोधी पक्षांची भीती वाटत आहे, त्यामुळे केंद्राच्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप राजदचे खासदार मनोज झा यांनी मंगळवारी केला. रेल्वेत नोकरी देण्यासाठी जमीन देण्यासंदर्भातील ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळ्याप्रकरणी हा तपास सुरू आहे. सन २००४ ते २००९ या कालावधीत हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

राजदचे विधान परिषद सदस्य शक्ती सिंह यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘कथित घोटाळा झाला, तेव्हा तेजस्वी यादव हे अल्पवयीन होते, हे सर्वज्ञात वास्तव आहे. बिहारमधील याआधीच्या महाआघाडीच्या सरकारने अनेकांना नोकऱ्या दिल्याने भाजप नेते गोंधळून गेले आहेत,’ असे शक्ति सिंह म्हणाले. महाआघाडीमध्ये राजद हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना या आरोपांचा समाचार घेतला. ‘लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री होते, तेव्हा ते चारा घोटाळ्यात सहभागी होते. ते रेल्वेमंत्री होते, तेव्हा जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळा झाला. ईडी निश्चितच या प्रकरणी चौकशी करेल,’ असे चौधरी म्हणाले.

पुरवणी आरोपपत्र दाखल करणार

नवी दिल्ली-जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात एका महिन्याच्या कालावधीत पुरवणी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती सीबीआयने मंगळवारी दिल्लीतील विशेष न्यायालयाला दिली. या प्रकरणी अंतिम अहवाल फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सादर केला जाईल, असेही सीबीआयने विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *