चेन्नई : परिस्थिती माणसाला हतबल करते. पण जे परिस्थितीपुढे हतबल होत नाहीत, तेच बदल घडवतात. अशीच गोष्ट ग्रीष्मा थोरातची. वडिल घरात एकटेच कमावते होते. करोनाच्या काळात त्यांना कुटुंबियांनी गमावले. घरावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला होता. आईने अंगणवाडी सेविकेची नोकरी करायाल सुरुवात केली. ग्रीष्माने यावेळीही आपले खेळावरचे प्रेम सोडले नाही आणि आता आपल्या वडिलांचे स्वप्न तिने पूर्ण केले आहे. ठाण्याच्या वेटलिफ्टर ग्रीष्मा थोरातने खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ मध्ये मुलींच्या ७६ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. अनेक संकटांना सामोरे जाताना जिंकलेले हे पदक तिच्यासाठी खूप मौल्यवान आहे. गेल्या दोन वर्षांपासून ग्रीष्माचे आयुष्य तिच्या दिवंगत वडिलांच्या आठवणींभोवती फिरत आहे. ग्रीष्मा २०२२ मध्ये ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सहाव्या स्थानासह भुवनेश्वरहून परतल्यानंतर केवळ चार दिवसांनी कोविड संसर्गामुळे वडिलांचे निधन झाले होते.

“मी २०२२ साली भुवनेश्वरहून परत आल्यानंतर काही दिवसांनी, माझ्या वडिलांना कोविडमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. आम्ही सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार नव्हतो आणि आम्हाला वाटले की ते बरे होतील. पण, नशिबाने आमच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहिले होते,” असे भावनिक ग्रीष्मा म्हणाली. ती स्थानिक शाळेत दहावी इयत्तेत शिकत आहे.

“माझ्या कारकिर्दीतील हा (गेली दोन वर्षे) आतापर्यंतचा सर्वात कठीण टप्पा होता. प्रत्येक वेळी मी ट्रेनिंगला जाते किंवा काहीही करायला सुरुवात करते तेव्हा वडिलांच्या आठवणी माझ्यासमोर येत राहतात. मी मानसिकदृष्ट्या खचली होते. मी कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नव्हते,” असे ती म्हणाली.

“माझे वडील चॉकलेटच्या कारखान्यात काम करायचे आणि ते कुटुंबातील एकमेव कमावणारे होते. हा काळ कठीण होता, पण माझ्या आईने तिच्या मर्यादित उत्पन्नातून कुटुंब कसेतरी सांभाळले आहे,” असे ती पुढे म्हणाली. तिच्या आईने ठाण्यातील एका अंगणवाडी केंद्रात केअरटेकरची नोकरी स्वीकारली आहे आणि त्या ग्रीष्मा तसेच तिच्या जुळ्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च त्यातून भागवतात.

खेलो इंडिया युथ गेम्सच्या या आवृत्तीपूर्वी, ग्रीष्मा पंचकुला व इंदूरमध्ये अनुक्रमे सहाव्या व चौथ्या स्थानावर राहिली होती. ती स्वतःला प्रेरित करण्यासाठी धडपडत होती आणि तिने परिस्थिती बदलण्यात यश मिळवले. अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे या महिन्याच्या सुरुवातीला ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले.

IPL ऑक्शनचं ठरलं, ४ भारतीयांची बेस प्राईज २ कोटी

“माझ्या प्रशिक्षक माधुरी सिंहासने यांनी मला या संकटातून बाहेर येण्यास मदत केली आहे आणि या आव्हानात्मक काळात माझ्यासोबत राहिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे,” असे ती म्हणाली. या महिन्यात बॅक-टू- बॅक पोडियम फिनिशने प्रेरित होऊन, ग्रीष्मा आता पाटणा येथे मार्चमध्ये होणाऱ्या आगामी १७ वर्षांखालील शालेय स्पर्धेत अव्वल पोडियम फिनिश करण्याकडे लक्ष देत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *