धुळे: तालुक्यातील वडणे- बुरझड गावात पहाटे अचानक घराचे छत कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून पिता पुत्राचा करूण अंत झाला. गावातील शिवसेनेच्या शाखाप्रमुखासह शिवसैनिकांनी वेळीच धाव घेत तिघांचे प्राण वाचविले. त्यांना धुळे शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

सोनगीर पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या वडणे बुरझड येथे प्रवीण भगवान पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात. शेती करून ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. काल मंगळवारी रात्री ते नेहमीप्रमाणे मुलगा गणेश प्रवीण पाटील, पत्नी आशाबाई प्रवीण पाटील, मुलगी भूमी व हेमांगी पाटील यांच्यासह घरात झोपले होते. आज पहाटे दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास त्यांच्या मातीच्या घराचे छत अचानक कोसळले. त्या खाली पिता-पुत्र पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. हा प्रकार लक्षात येताच मुली व त्यांच्या आईने एकच हंबरडा फोडत आरडाओरड सुरू केली.

छत कोसळण्याचा मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांसह शिवसेनेचे शाखाप्रमुख रूपसिंग गिरासे, ओंकार पाटील, राजेंद्र पाटील व शिवसैनिकानी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी प्रथम दोन्ही मुली आणि महिलेला बाहेर काढले. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून प्रवीण पाटील (वय ३५) ) आणि त्यांचा मुलगा गणेश (वय १२) यांचा जागीच मृत्यू झाला होता. गणेश हा इयता चौथीत शिकत होता, आशाबाई (वय ३०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून दुपारी उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते. मृत प्रवीण पाटील हे शेती करीत होते. त्यातूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. या दोघांच्या निधनामुळे पाटील कुटुंबाबर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे.

या घटनेची सोनगीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. वडणे बुरझड येथील दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेचे वृत्त हे संपूर्ण गावात वाऱ्यासारखे पसरले. बातमी कळताच घटनास्थळी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. येथे दाखल झालेल्यांनी जखमी आणि मृतांना मातीच्या ढिगाऱ्याखालून काढण्यासाठी मोलाचे सहकार्य केले, या घटनेने संपुर्ण गाव सुन्न झाले आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

जखमी महिला आणि मुलींना धुळे शहरातील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनी तत्काळ शासकीय यंत्रणेला कामाला लावले. महसूल विभाग व पोलिस प्रशासनाकडून दुपारी उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *