पाटणा: करोना काळापासून हृदय विकाराच्या घटना वाढल्या आहेत. हृदय विकाराच्या झटक्यांमुळे अनेकांचा जीव गेला आहे. यात तरुणांचं प्रमाणही लक्षणीय आहे. आता बिहारच्या गोपालगंजमध्ये घडलेल्या दोन घटनांची चर्चा सुरू आहे. २४ तासांच्या आत दोन जणांचा हृदय विकाराच्या झटक्यांमुळे मृत्यू झाला. शनिवारी दिवाणी न्यायालयात न्यायमूर्तींसमोर युक्तिवाद करत असताना एका वकिलाला हृदय विकाराचा झटका आला. काही सेकंदांत त्यांचा मृत्यू झाला. दिलीप कुमार त्रिपाठी असं मृत वकिलाचं नाव आहे. ते कुचायकोटच्या बंगरा गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.दिलीप कुमार यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे सहायक नंदू कुमार तिवारी सायकलनं गौसिया गावातून निघाले होते. धामापाकड गावाजवळ असताना त्यांनाही हृदय विकाराचा झटका आला. ते रस्त्यात कोसळले. त्यांनी मोबाईलवरुन कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. आसपासचे लोक मदतीसाठी पोहोचले. पण तोपर्यंत नंदू तिवारींनी जीव सोडला होता.दिलीप कुमार त्रिपाठी १९९१ पासून दिवाणी न्यायालयात वकिली करत होते. तेव्हापासूनच नंदू कुमार तिवारी त्यांचे सहायक म्हणून कार्यरत होते. नंदू यांनी लग्न केलं नव्हतं. ते घरी एकटेच राहायचे. उदरनिर्वाहासाठी दिलीप कुमारांकडे काम करायचे. दोघांचं नातं भावंडांसारखं होतं. दिलीप कुमार सहायक नंदू यांना लहान भावासारखे वागवायचे. अवघ्या २४ तासांमध्ये दोघांचंही निधन झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *