नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमधील ड्रग्ज व्यवसायाविरोधात प्रशासनाची कारवाई सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये दिल्ली पोलिसांनी छापा टाकून ड्रग्ज तयार करणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात चार परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स सेलनं केलेल्या कारवाईत कोट्यवधींचे अंमली पदार्थ आणि ते तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हाती लागला आहे.ग्रेटर नोएडाच्या फॅक्टरीतून मेथाम्फेटामाईन ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात आफ्रिकेच्या चार नागरिकांना अटक झाली आहे. एका पॉश घरात अंमली पदार्थ तयार करण्याचं काम सुरू होतं. त्याची कल्पना कोणालाच नव्हती. ग्रेटर नोएडातील ऍलेस्टॉनिया इस्टेट इमारतीत हा सगळा प्रकार सुरू होता. दिल्ली पोलिसांनी काल पॉश फ्लॅटवर छापा टाकला आणि ४४५ ग्रॅम मेथाम्फेटामाईन जप्त केलं. हे ड्रग्ज उत्तम दर्जाचं आहे. या फ्लॅटमध्ये मेथाम्फेटामाईन तयार करण्यासाठीचा २०.५ किलोचा कच्चा माल सापडला.पॉश फ्लॅटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मेथाम्फेटामाईन तयार केलं जात होतं. ही सगळी यंत्रसामग्री आणि साहित्य नार्कोटिक्स सेलनं जप्त केलं आहे. त्यात हिटिंग मँटल मशीन आणि उच्च दर्जाच्या फेस मास्कचा समावेश आहे. आरोपींनी फ्लॅटमध्ये ड्रग्ज तयार करण्यासाठी प्रयोगशाळा तयार केली होती. इझे उचेन्ना जेम्स (४९), अलिटुमो इफेडी शेड्रक (२८), इझे इबे इमेका चिबुझो उर्फ इको (५६) आणि इवि ओसिटा उर्फ उस्टा उर्फ ओसे (४४) अशी आरोपींची नावं आहेत.चार आरोपींपैकी दोघांना याआधीही ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर त्यांना सशर्त जामीन मिळाला होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त अंकित सिंह यांनी दिली. अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे. ग्रेटर नोएडामध्ये झालेली कारवाई त्याच मोहिमेचा भाग होती. दिल्ली पोलिसांच्या नार्कोटिक्स विरोधी पथकानं २७ नोव्हेंबर २०२३ रोजीही अशीच कारवाई केली होती. द्वारका जिल्ह्यात नायजेरियन नागरिक ड्रग रॅकेट चालवत असल्याची टिप पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी उत्तम नगरमध्ये छापा टाकून नायजेरियन नागरिकाला बेड्या ठोकल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *