सातारा : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अजनुज येथील पवार कुटुंबीय धोम-बलकवडी कालव्यावर कपडे, गोधड्या धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी शंभुराज विक्रम पवार (वय ५) आणि विक्रम मधुकर पवार (वय ३२) हे बापलेक कालव्यात वाहून गेले. या घटनेत शंभुराज याचा मृत्यू झाला, तर विक्रम हे बेपत्ता आहेत. खंडाळा-शिरवळ रेस्क्यू टिम व परिसरातील ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा तालुक्यातील अजनुज येथील पवार कुटुंबीय पाच-सहा लोक धोम-बलकवडी कालव्यावर कपडे, गोधडी धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाच वर्षाचा शंभुराजही त्यांच्याबरोबर गेला होता. तो तेथेच पाण्याजवळ उभा असताना अचानक पाय घसरून कालव्याच्या पाण्यात पडला आणि तो वाहून जाऊ लागला. ही घटना लक्षात आल्याने त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील विक्रम यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने ते दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

शंभुराजचे आजोबा मधुकर पवार यांनी त्यांना वाचण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहास वेग असल्याने ते सुद्धा वाहून जाऊ लागले. प्रसंगावधान राखून त्यांना त्यांच्या सुनेने साडीच्या साह्याने वाचवले. मात्र, शंभुराज व विक्रम हे बापलेक वाहून गेले. शंभुराज हा घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटरवर पाण्यातून वाहताना परिसरातील ग्रामस्थांना दिसला. त्यावेळी बचाव कार्यासाठी आलेल्या रेस्क्यू टीमच्या तरुणांनी पाण्यात उड्या मारून त्यास बाहेर काढले. त्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. विक्रम पवार यांचा पोलीस, रेस्क्यू टिम व नागरिकांनी शोध घेतला. मात्र, संध्याकाळपर्यंत ते सापडले नव्हते. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.

तहसीलदार अजित पाटील, पोलीस निरिक्षक सुनिल शेळके, नायब तहसिलदार योगेश चंदनशिवे, मंडलाधिकारी संतोष नाबर यांनी घटनास्थळी भेट दिली. खंडाळा-शिरवळ रेस्क्यू टिम व परिसरातील ग्रामस्थांनी शोध कार्यात मदत केली. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *