[ad_1]

मुंबई : माझ्यासाठी पक्षाने खूप केलं पण मी देखील पक्षासाठी खूप कष्ट घेतले. जन्मापासून आतापर्यंत काँग्रेसचं काम केलं. आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत यासाठी मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. त्याचवेळी भाजपप्रवेशाचा निर्णय आणखी मी घेतलेला नाही. माझ्या पुढील राजकीय निर्णयासाठी २ ते ३ दिवसांचा अवधी लागेल, असं सूचकपणे त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शाह १५ तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर येतायेत. त्याचवेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसे संकेतही अशोक चव्हाण यांनी आपल्या बोलण्यातून दिले.

काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच अशोक चव्हाण प्रसारमाध्यमांसमोर आले. ज्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला मुख्यमंत्रिपदावर बसवलं, महत्त्वाची मंत्रिपदं दिली तो पक्ष सोडण्याचं कारण काय? आता पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार? अशा प्रश्नांचा भडीमार पत्रकारांनी चव्हाण यांच्यावर केला. त्यावेळी राजीनाम्यामागची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

मी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीला काही कारण असावंच असं नाही. काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. कोणाबद्दलही व्यक्तिगत माझ्या मनात वेगळी भावना नाही. यापुढची राजकीय दिशा ठरविण्यासाठी एक दोन दिवसांचा अवधी लागेल. पुढच्या दोन दिवसांत माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन. परंतु भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

जन्मापासून आतापर्यंत काँग्रेसचं काम, आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, अशा भावनेतून मी राजीनामा दिला. पक्षांतर्गत गोष्टीबद्दल बोलणार नाही. कुणाचीही उणीदुणी काढणार नाही, तो माझा स्वभाव नाही, असे सांगतानाच काँग्रेस पक्षातील अन्य कोणत्याही आमदारासोबत चर्चा झालेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. भाजप प्रवेश हा चांगला पर्याय वाटतोय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर आणखी त्याबद्दल विचार केलेला नाही, असं उत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं. त्याचवेळी भाजपकडून आपण राज्यसभेवर जाणार आहात, अशा चर्चा असल्याचं पत्रकारांनी विचारल्यावर ‘आणखी माझा राजकीय निर्णय झालेला नाही, पुढच्या २-३ दिवसांत निर्णय घेईन. राजीनामा देऊन तीन तास झालेत, असं म्हणून त्यांनी राज्यसभेवरील प्रश्नाला उत्तर देणं टाळलं.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *