[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पुणे शहराला उपयुक्त ठरणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठीचा राज्य आणि केंद्र सरकारचा निधी देण्यात आला. मात्र, पुणे महापालिकेने त्यांचा हिस्सा अद्याप दिला नसल्याने उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पुणे महापालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले. तत्काळ निधी देण्याचे आदेशही दिल्याने मार्चपर्यंत निधी उपलब्ध करून देऊ,’ अशी ग्वाही महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात, ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक झाली. त्या वेळी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंदवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

या वेळी अजित पवार यांनी पुणे शहरातील मेट्रो मार्ग एक, दोन आणि तीन या मार्गांचा आढावा घेतला. त्या वेळी पुणे मेट्रो प्रकल्पाला पुणे महापालिकेने अद्याप निधी दिला नसल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी अजित पवार यांनी उपस्थित महापालिका आय़ुक्त विक्रमकुमार यांच्याकडे ‘मेट्रोच्या निधीचा हिस्सा का दिला नाही’, अशी विचारणा केली. निधी तातडीने देण्याचे निर्देश दिले. त्यावर महापालिका आयुक्तांनी ‘येत्या मार्च महिन्यापर्यंत मेट्रोसाठीचा पालिकेचा हिस्सा देऊ,’ अशी ग्वाही दिली.

या प्रकल्पांबाबत घेतला आढावा

मंत्रालयातील ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’च्या बैठकीत पुणे रिंग रोड, लोणावळा येथील स्कायवॉक आणि टायगर पॉइंट; तसेच पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’ संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, पुणे येथील कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, इंद्रायणी मेडिसिटी, पिंपरी-चिंचवड येथील सायन्स इनोव्हेशन सिटी, वढू-तुळापूर येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक, ऑलिम्पिक भवन, बारामती येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या सर्व प्रकल्पांना गती देण्याचे आदेश अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

रिल्स टाकले तर थेट तडीपार; अमितेश कुमारांची शेवटची वाॅर्निंग, रांगेत गजा मारणेही हात बांधून उभा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *