वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

किशोरवयीनांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर सोमवारी न्यूयॉर्क सिटी सबवे स्थानकावर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.

ब्रॉन्क्समधील एका फलाटावर संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यावेळी शहरातील स्थानके ही शाळेतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांनी गजबजलेली होती.

या घटनेत ३४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींमध्ये १४ वर्षांची मुलगी आणि १५ वर्षांचा मुलगा; तसेच २८, २९ आणि ७१ वर्षांच्या तीन पुरुषांचा समावेश आहे. पीडितांपैकी काही लोक भांडणात गुंतले होते आणि इतर ट्रेनची वाट पाहत होते. जखमींपैकी चौघांना गंभीर दुखापत झाली आहे, असे वृत्त आहे.

हा काही एखाद्या व्यक्तीने ट्रेन किंवा रेल्वे स्थानकावर अंदाधुंद केलेला गोळीबार नाही. ही घटना ट्रेनमध्ये असताना, दोन गटांमध्ये भांडण सुरू झाल्यामुळे घडली, असे ‘एनवायपीडी’च्या परिवहन विभागाचे प्रमुख मायकेल केम्पर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ट्रेन स्थानकावर थांबली तेव्हा गोळीबार सुरू झाला, असेही त्यांनी सांगितले.

‘ट्रेनची दारे उघडली आणि गटातील एका व्यक्तीने किंवा दोन्ही गटांमधून बंदूक बाहेर काढून गोळीबार करण्यात आला. लोक ट्रेनमधून उतरले आणि फलाटाच्या दिशेने धावू लागले. त्यावेळी फलाटावर आणखी गोळ्या झाडल्या गेल्या,’ असेही केम्पर म्हणाले. दरम्यान, घटनास्थळावरून पळून गेलेल्या एका हल्लेखोराचा शोध सुरू आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *