वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारत आणि म्यानमारदरम्यानचा मुक्तसंचार (इंडिया-म्यानमार फ्री मूव्हमेंट रेजिम-एफएमआर) संपुष्टात आणण्याच्या निर्णयाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी पुनरुच्चार केला. देशाची अंतर्गत सुरक्षा व ईशान्येकडील राज्यांतील लोकसंख्येची रचना अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले. एफएमआर रद्द करण्यासाठीची प्रक्रिया परराष्ट्र मंत्रालयातर्फे सध्या सुरू आहे. परंतु ही सुविधा तातडीने बंद करावी, अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे, असेही शहा यांनी सांगितले.

देशाच्या सर्व सीमा सुरक्षित असाव्यात व तेथे कुंपण असावे हे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच मांडले आहे. त्यानुसारच म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालण्यात येणार आहे, असे शहा यांनी नमूद केले.
भारत व म्यानमारदरम्यान १,६४३ किमी लांबीची सीमा आहे. ईशान्य भारतातील मिझोरम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही राज्ये या सीमेलगत आहेत. दोन्ही बाजूंच्या सीमेलगत राहणारे असंख्य नागरिक हे एकाच समाजाचे अथवा एकमेकांचे नातेवाईक आहेत. केंद्र सरकारने अॅक्ट इस्ट धोरणांतर्गत २०१८मध्ये एफएमआर ही सुविधा सुरू केली. या सुविधेमुळे दोन्ही बाजूच्या नागरिकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय परस्परांच्या प्रदेशात १६ किमीपर्यंत संचार करण्याची मुभा आहे.

आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? सर्व राज्यांचा निकाल वाचा एका क्लिकवर
सीमेवर कुंपण नसल्याने म्यानमारमधील आदिवासी उग्रवादी ईशान्येकडील राज्यांत घुसखोरी करतात. तसेच, म्यानमारमधून ईशान्य भारतात अमली पदार्थही आणले जातात, असा आरोप इम्फाळच्या खोऱ्यातील मैतेई समाजाने वारंवार केला आहे. मणिपूर सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये सादर केलेल्या अहवालानुसार म्यानमारमधून सातशे घुसखोरांनी मणिपूरमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय, म्यानमारमधील हजारो हिंसक बंडखोरांनी गेल्या तीन वर्षांत मिझोरममध्ये घुसखोरी केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार म्यानमारमधून आलेले हजारो निर्वासित मिझोरमच्या अनेक भागांत वास्तव्यास आहेत.

म्यानमारसोबत कोणाची किती किमी सीमा?
-मणिपूर ३९० किमी
-मिझोरम ५१० किमी
-अरुणाचल प्रदेश ५२० किमी
-नागालँड २१५

बांगलादेशचा पाठिंबा

भारताच्या या निर्णयास बांगलादेशने पाठिंबा दर्शवला आहे. म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालण्याच्या निर्णयामुळे भारतात तसेच, एकंदरीत या क्षेत्रात होणारी घुसखोरी थांबेल. दहशतवादाच्या प्रश्नी आमच्या देशाचेही ‘शून्य सहिष्णूता’ हे धोरण आहे, अशी प्रतिक्रिया भारत दौऱ्यावर आलेले बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री हसन महमूद यांनी दिली. म्यानमारमधून आमच्या देशात घुसलेल्या १२ लाख रोहिंग्यांचे आम्हाला ओझे झाले असून त्यांची पाठवणी करण्यासाठी भारताने सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *