[ad_1]

पुणे : ग्रामीण भागातील ठाकर समाज हा अती मागास समजला जातो. मात्र, या समाजातील महिला देखील आता स्वावलंबी बनत चालल्या असून स्वतःचा व्यवसाय करत त्या आपले कुटुंब सांभाळत आहेत. इतर आदिवासी पुरुष आणि महिलांना देखील रोजगार देत आहेत. या आदिवासी महिलेच्या जिद्दीला सलाम करावा तेवढा थोडाच आहे.

जुन्नर तालुक्यातील नारायणगावजवळ असणाऱ्या वारूळवाडी येथील ठाकर वस्तीवरील सोनाली पारधी यांचं शिक्षण जेमतेम दहावी. पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्याने इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षात शिक्षण सोडून वडिलांनी त्यांचं लग्न केलं. मात्र, मनात काहीतरी करण्याची जिद्द असल्यामुळे सोनाली यांनी आपल्या शेतात ‘सोनाली एन्टरप्राईजेस’ या नावाने केळी आणि बटाटा वेफर्सचा व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायातून सोनाली पारधी या आज हजारोंची उलाढाल करत आहेत. पतीचे शिक्षण नसल्याने लग्नानंतर सोनाली यांनी पतीसोबत दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीची कामे केली. त्यानंतर वेफर्स निर्मिती करणाऱ्या कंपनीत काही वर्ष काम केले. तिथे सर्व व्यवसायाविषयी बारकावे शिकले. त्यासाठी लागणाऱ्या भांडवलाचा अभ्यास केला. त्यातून पतीच्या मदतीने स्वतःचा घरगुती वेफर्स निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या व्यवसायातून १५ हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

कुठे सुरू केला व्यवसाय
सोनाली यांनी आपल्या शेतामध्ये एक पत्र्याचे शेड तयार करून त्यामध्ये त्या वेफर्सचे उत्पादन घेतात. ‘सोनाली वेफर्स’ या त्यांच्या स्वतःच्या नावाचाच ब्रॅण्ड त्यांनी तयार केला असून, त्यांच्या या व्यवसायामुळे आजूबाजूच्या १० ते १२ महिलांना रोजगार मिळाला आहे.

माणसाची परिस्थिती कशीही असो किंवा जन्म कोणत्याही समाजात झालेला असो. एखाद्याकडे जिद्द, चिकाटी व मेहनत असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करून दाखवू शकतो. याचे उदाहरण सोनाली यांच्या रूपात पाहायला मिळत आहे. सोनाली यांच्या नवऱ्याने त्यांना दिलेली भक्कम साथ यामुळे सोनाली यांनी व्यवसायात एवढी मोठी भरारी घेतली आहे. स्वतःचा ब्रँड तयार करून तो घराघरात पोहोचवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रत्येक लहान मोठ्या व्यावसायिकांसोबत त्यांनी टायअप केला आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सोनाली यांच्या जिद्दीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक महिलांनी सोनाली यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे. एक महिला मनात आणलं तर काय करू शकते हेच यावरून दिसून येतं.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *