[ad_1]

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता गेल्या अनेक महिन्यांपासून वर्तवली जात होती. काल त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्या पक्षांतरानं काँग्रेसला धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारनं काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेल्या घोटाळ्यांबद्दल एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. त्यातील २४ व्या पानावर आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. या घोटाळ्यावरुन भाजपनं काँग्रेसला धारेवर धरलं होतं. त्यावेळी भाजप विरोधी पक्षात होता. आदर्श घोटाळा प्रकरणात झालेल्या आरोपांनंतर त्यांनी राजीनामा दिला होता. आता भाजपची सत्ता असताना, मोदी सरकारनं भ्रष्टाचार प्रकरणांवरुन श्वेतपत्रिका काढलेली असताना चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अशोक चव्हाणांना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, पण फडणवीसांचा कडाडून विरोध; कारण काय?
पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी जून महिन्याच्या अखेरीस एका सभेत सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर अवघ्या १०० तासांत अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल यांच्यावर भाजपनं भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले होते. पण आता हीच मंडळी सत्तेत असून अनेकांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. आता हेच नेते फडणवीसांसोबत एकाच मंत्रिमंडळात आहेत.

नारायण राणे, कृपाशंकर सिंह, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांवर भाजपनं भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भाजपचं सरकार आल्यावर भ्रष्टाचारी नेते तुरुंगात जातील अशी विधानं करण्यात आली. पण प्रत्यक्षात वेगळंच चित्र दिसलं. भाजप सत्तेत येताच, चौकशांचा ससेमिरा पाठीमागे लागताच या नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यानंतर यातील एकही नेता तुरुंगात गेला नाही.

ऑक्टोबर २०२१ मध्ये भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचं एक विधान चर्चेत होतं. भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही, असं पाटील म्हणाले होते. मावळमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार होतं. केंद्रीय तपास यंत्रणांकडून मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांच्या चौकशा सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर पाटलांनी केलेल्या विधानाची चर्चा झाली.

अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आज झाला. त्यावेळी हर्षवर्धन पाटील तिथेच होते. भाजपमध्ये गेल्यापासून शांत झोप लागते म्हणणारे पाटील आज चव्हाणांच्या पक्ष प्रवेशावेळी टिपण्यात आलेल्या अनेक फोटोंमध्ये दिसत आहेत. चेहऱ्यावर कोणतीही चिंता नसलेले पाटील सुहास्य वदनानं चव्हाण यांचं पक्षात स्वागत करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारनं काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. त्या घोटाळ्यात नाव असलेले चव्हाण आज तितक्याच सुहास्य वदनानं भाजपमध्ये प्रवेश केला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *