वृत्तसंस्था, हलद्वानी (उत्तराखंड): शहरातील अनधिकृत मदरशावर गुरुवारी तोडकामाची कारवाई करण्यात आल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात सहा दंगलखोरांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. या दंगलीत एका पत्रकारासह सात जण जखमी झाले असून, जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून, दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश गुरुवारी जारी करण्यात आले आहेत.

‘पोलिस ठाणे व पोलिस कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. तसेच तीन ‘एफआयआर’ नोंदवण्यात आले आहेत. जवळपास १५ ते २० जणांनी जमावाला भडकवल्याचे समोर आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या भागात एक हजार १०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत’, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रल्हाद मीणा यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

‘स्थानिक रहिवाशांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करीत पेट्रोलबॉम्बही फेकल्यामुळे गुरुवारी ६०हून अधिक लोक जखमी झाले. त्यापैकी बहुतेकांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यात आश्रय घेण्यास भाग पाडल्यानंतर जमावाने पोलिस ठाण्याला आग लावली. रुग्णालयांत दाखल जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर, एकूण सहा दंगलखोर ठार झाले’, असे पोलिस अधीक्षक (शहर) हरबन्स सिंग यांनी सांगितले.

‘मदरसा वाचवण्यापेक्षा प्रशासकीय अधिकारी, सरकारी यंत्रणेला लक्ष्य करण्यासह कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याकडे हल्लेखोरांचा जास्त कल होता. दगड व पेट्रोलबॉम्ब फेकणाऱ्या जमावावर सुरुवातीला बळाचा वापर करण्यात आला नव्हता. मात्र त्यांनी पोलिस ठाण्यावर हल्ला केल्यानंतर आत अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या रक्षणार्थ हल्लेखोरांच्या पायावर गोळी झाडण्याचे आदेश देण्यात आले’, असे जिल्हा दंडाधिकारी सिंह यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री धामी यांनी देहराडून येथील सरकारी निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) ए. पी. अंशुमन यांना हलद्वानीमध्ये शांतता व कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पोलिस कर्मचारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ल्याची मुख्यमंत्री धामी यांनी गंभीर दखल घेतली असून, बनभूलपुरा भागात अशांतता पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ‘हिंसाचारात सामील असलेल्या व पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या प्रत्येकाची ओळख पटवून त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल’, असे धामी म्हणाले.

‘पोलिसांवरील नियोजित हल्ला’


मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी हलद्वानीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ‘ही दंगल म्हणजे पोलिसांवरील नियोजित हल्ला होता’, असे ते म्हणाले. उत्तराखंडमधील हलद्वानी येथे झालेला हिंसाचार हे षडयंत्र असल्याचा आरोप करत यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या खासदारांनी शुक्रवारी केली. हल्लेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याची मागणी भाजपचे उत्तर प्रदेशचे राज्यसभेतील खासदार हरनाथ यादव यांनी केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *