मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यावर भारतीय संघास सोमवारी सकाळी दोन हादरे बसले. माजी कर्णधार विराट कोहलीविना खेळणाऱ्या भारतीय संघास दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्याविना उतरावे लागणार आहे. विशाखापट्टणमला होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी जायबंदी झालेल्या राहुलऐवजी देशांतर्गत स्पर्धेत सातत्याने धावा करणाऱ्या सर्फराझ खानची निवड करण्यात आली आहे.

जडेजाची पोटरी रविवारी फलंदाजी करताना दुखावली आहे, तर राहुलच्या उजव्या मांडीचा स्नायू दुखावला आहे. त्यामुळे दोघेही दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाहीत, असे भारतीय क्रिकेट बोर्डाने सांगितले. राहुलची दुखापत जास्त चिंताजनक आहे. गत वर्षी आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षण करताना त्याला याच प्रकारची दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच तो चार महिन्यानंतर भारतीय संघात परतला होता; मात्र त्याची दुखापत जास्त गंभीर नाही. जाडेजाबाबत जास्त चिंता वाटत आहे, असे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले.

सर्फराझप्रमाणेच भारतीय फिरकी गोलंदाजी भक्कम करण्याासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभकुमार; तसेच अष्टपैलू ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरची निवड झाली आहे. राहुलऐवजी रजत पाटीदार आणि सर्फराझ यांच्यात अंतिम संघातील स्थानासाठी चुरस असेल. त्याच वेळी जडेजाऐवजी कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात स्पर्धा असेल.

विराट कोहलीऐवजी पाटीदारचा समावेश केल्यामुळे सर्फराझचे चाहते निराश झाले होते. इंग्लंड लायन्सविरुद्ध १६० चेंडूंत १६१ धावा करून सर्फराझने त्यास प्रत्युत्तर दिले. दक्षिण आफ्रिकेत त्याने भारतीय संघातील गोलंदाजांचा सामना करताना शतक केले होते. त्याला नुकतेच देशांतर्गत स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्याबद्दल खास बक्षीस देण्यात आले होते. त्याने ४५ प्रथम श्रेणी सामन्यांत ६९.८५च्या सरासरीने ३ हजार ९१२ धावा केल्या आहेत. त्याने १४ शतके आणि ११ अर्धशतके केली आहेत. गेल्या बऱ्याच कालावधीपासून सर्फराझ हा आपली भारतीय संघात निवड होईल म्हणून आस लावून बसलेला होता. पण अखेर त्याला भारतीय संघात संधी मिळाली आहे.

युवा क्रिकेटपटूच्या ‘या’ कामाचा कोहलीलाही वाटेल अभिमान

भारतीय संघात कोहलीच्या जागी रजत पाटीदार आला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी रजतला संधी मिळणार की सर्फराझ पदार्पण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *