संजय घारपुरे : इंग्लंडचा उपकर्णधार ओली पोप याने भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या क्रिकेट कसोटीत बहारदार फलंदाजी करताना भारतीय फिरकीचे अस्त्र निष्प्रभ केले. त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापनाने दुसऱ्या कसोटीपासून आपले फिरकीचे अस्त्र कसे जास्त भेदक करता येईल, यासाठीची योजना आखण्यास सुरुवात केली आहे.

रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या तीन फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचे २० पैकी १४ फलंदाज बाद केले; पण त्यांच्या कामगिरीवर द्रविड समाधानी नाहीत. ‘पोपने सुरेख फलंदाजी केली यात प्रश्नच नाही; पण आम्हीही अधिक चांगली कामगिरी नक्कीच करू शकलो असतो. आम्ही आमची योजना पूर्णपणे अमलात आणली तर त्याच्याकडूनही नक्कीच चुक होईल,’ असे भारतीय प्रशिक्षक द्रविड यांनी सांगितले.

भारतीय संघाने मायदेशात दहा वर्षांत केवळ चौथी कसोटी रविवारी गमावली. पोपने दुसऱ्या डावात १९६ धावा करताना भारतीय फिरकी गोलंदाजांवर सहज हुकूमत राखली होती. त्याने स्कूप आणि स्वीपचा सढळ हस्ते वापर केला होता. त्याच्या पारंपरिक आणि रिव्हर्स स्वीपने भारतीय फिरकी गोलंदाजांची लय बिघडवली. त्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षणात बदल करणे भारतीय संघास भाग पडले होते.

भारतीय फिरकी गोलंदाजांचा प्रामुख्याने भारतात सामना करताना पाहुण्या संघातील फलंदाज बचावात्मक खेळतात; पण पोपने कमालीची आक्रमकता दाखवली. हे भारतीय संघासाठी धक्कादायक असल्याची कबुली प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली. ‘दर्जेदार भारतीय फिरकी गोलंदाजीविरुद्ध याप्रकारे स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचा वापर मी यापूर्वी बघितला नव्हता,’ असे द्रविड यांनी सांगितले.

पोपचे कौतुक करतानाच द्रविड यांना आगामी सामन्यातील आव्हानास नव्याने सामोरे जायला हवे, याची जाणीव होती. ‘आता आम्हाला त्यांना रोखण्यासाठी योजना तयार करावी लागणार आहे. स्वीप मारणे इंग्लंडच्या फलंदाजांना अवघड होईल, यासाठी टप्पा आणि दिशा यामध्ये बदल करता येईल. आम्ही नक्कीच त्यादृष्टीने विचार करणार आहोत,’ असे द्रविड म्हणाले.

बर्थ-डे स्पेशल: ‘द वॉल’ राहुल द्रविड

फिरकी हे भारताचे बलस्थान जरी असले तरी ऑली पोपने धडाकेबाज फटकेबाजी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. आता इंग्लंडला फिरकीच्या जोरावरच रोखण्यासाठी द्रविड यांनी नवीन रणनिती आणण्याचे ठरवले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *