[ad_1]

ठाणे : पावसाने दडी मारल्याने डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची पैदास वाढल्याने कल्याण-डोंबिवली शहरात तापाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले होते. त्यातच दहीहंडीच्या उत्सवादरम्यान साथरोगाचा फैलाव वेगाने झाल्याने संपूर्ण कल्याण-डोंबिवली शहर तापाने फणफणले आहे. खासगी दवाखान्यांसह सरकारी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढत आहे. आंबिवलीमधील इंजिनीअर तरुणीचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांकडून रुग्णांना रक्ततपासणीचा सल्ला दिला जात आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे जून ते ऑगस्ट दरम्यान तापाच्या १५ हजार रुग्णांची नोंद झाली असून १२० रुग्णांना टायफॉइडची लागण झाली आहे. डेंग्यूच्या ११० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. एच१एन१चे १२ रुग्ण सापडले आहेत. स्वाइन फ्लूची दहशत शहरात नसली, तरी आतापर्यंत मलेरियाच्या ६० रुग्णांची नोंदणी खासगी आणि सरकारी रुग्णालयांत करण्यात आली आहे. लेप्टोसह कावीळ आणि गॅस्ट्रो यांसारख्या संसर्गजन्य आजारांनीही डोके वर काढले आहे. त्यातच गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांना तापाची लागण झाली आहे. अनेक रुग्ण रुग्णालयात उपचार न घेता, खासगी स्वरूपात औषधविक्रेत्यांकडून औषधे घेऊन स्वत:च उपचार करत आहेत. रुग्णांनी सर्दी, ताप, अंगदुखी यांसारखे आजार अंगावर न काढता, आपल्या फॅमिली डॉक्टरकडून उपचार करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या खड्ड्यांत साचणारे पाणी डासांच्या पैदाशीसाठी पोषक वातावरण निर्माण करत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मोठी बातमी : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बेड्या
पालिकेकडून रुग्ण सापडलेल्या घरांमध्ये आणि परिसरात सर्वेक्षण केले जात आहे. संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी सरकारी प्रयोगशाळेत धाडले जात आहेत. वातावरणात बदल झाल्याने साथींच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याने आजारांबाबत बिलकुल हलगर्जी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

तीन महिन्यांत ३०० डेंग्यू रुग्ण

कल्याणमध्ये डेंग्यूमुळे २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस डेंग्यूचा प्रसार वाढत असून गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूचे ३०१ रुग्ण आढळले आहेत, तर जूनमध्ये ३२, जुलैमध्ये ८९ आणि ऑगस्टमध्ये तब्बल १८० रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. ठाण्यातील बदललेल्या वातावरणामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाल्याने डासांच्या चाव्यामुळे ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अहवालावरून समोर आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण ठाणे आणि कल्याण महापालिकेच्या हद्दीत आढळून आले आहेत.

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असल्या तरी रुग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या रुग्णांच्या अहवालामध्ये डासांपासून होणाऱ्या आजाराच्या रुग्णसंख्येत ऑगस्ट महिन्यात वाढ दिसून येत आहे. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर सर्वाधिक मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण ठाणे महापालिकेच्या हद्दीत आढळून आले आहेत, त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीमध्ये सर्वाधिक रुग्ण असल्याची नोंद आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने डासांची उत्पत्ती होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात असून औषध फवारणीही केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

फोन टॅप प्रकरणी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाकडून दोन्ही एफआयआर रद्द

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *