दरम्यान, आज सह्याद्री अतिथीगृहावरील चर्चेनंतर अर्जुन खोतकर यांच्यासह मनोज जरांगे-पाटील यांचे शिष्टमंडळ पुन्हा जालन्याकडे रवाना झाले होते. हे शिष्टमंडळ विमानतळावर आले तेव्हा अर्जुन खोतकर यांच्या हातात एक बंद लिफाफा होता. या लिफाफ्यात राज्य सरकारचा अंतिम प्रस्ताव होता. हा प्रस्ताव मान्य करत जरांगे उपोषणाचा त्याग करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. ते अपयशी ठरलं असलं, तरी खोतकर यामध्ये केंद्रस्थानी राहिले आहेत.
कोण आहेत अर्जुन खोतकर?
अर्जुन खोतकर हे कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेत सक्रिय होते. खोतकर हे मराठवाड्यातील नावाजलेले नेते आहेत. १९९० साली अर्जुन खोतकर वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले. १९९५ ते १९९९ या काळात ते दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले. यापैकी १९९७ ते १९९९ या काळात पाणीपुरवठा, पर्यटन, माहिती जनसंपर्क खात्याचं मंत्रिपद आणि उस्मानाबादचं पालकमंत्रिपद त्यांनी सांभाळलं होतं.
१९९९ मध्ये पराभव झाला, पण २००४ मध्ये खोतकरांनी तिसऱ्यांदा विधीमंडळ गाठलं. त्यानंतर २००९ साली घनसावंगी मतदारसंघातून त्यांना पुन्हा पराभवाचा फटका बसला. २०१४ मध्ये चौथ्यांदा आमदार होऊन ते पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री झाले.
१९९९ मध्ये कैलास गोरंट्याल विजयी झाले, तर २००४ मध्ये मतदारांनी खोतकरांना संधी दिली, २००९ मध्ये पुन्हा गोरंट्याल यांच्या पारड्यात मतदारांनी विजयाचं दान टाकलं. तर २०१४ मध्ये पुन्हा खोतकरांनी विजयाची चव चाखली, ती अवघ्या २९६ मतांनी.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांनी एकमेकांवर जबरदस्त टीका केली होती. शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी अर्जुन खोतकर यांनी जालन्याच्या जागेवर दावा करत दानवेंना आस्मान दाखवण्याची भाषा केली होती. मात्र युती झाल्यानंतर ही जागा भाजपला देण्यात आली आणि खोतकरांनीही सौहार्दाची भूमिका घेतली.
एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंसोबत फारकत घेतली. त्यानंतर एक-एक करुन नेते शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. सुरुवातीपासूनच सावध भूमिका घेत आलेल्या खोतकरांनी यथावकाश शिंदेंच्या सेनेची वाट धरली. यावेळी त्यांनी अत्यंत भावूक होत ठाकरेंवर आरोप केले होते.