जिल्ह्यात सोयाबीनची कापणी झालेली आहे; परंतु जिल्ह्यात सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी कुठेही केंद्र सुरू झाले नाही. मात्र, अधिकृत लायसेन्सधारक खरेदीदार व्यापारी ते खरेदी करत आहेत. त्यांच्याकडे शेतकरी विक्रीसाठी नेत आहेत. सोयाबीन प्रति क्विंटल ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपयांनी खरेदी केलं जात आहे. दिवाळी आधी हाच दर चार हजार सहाशे हमीभावाप्रमाणे सुरू होता.
या हंगामात सोयाबीन काढल्यानंतर दीपावली सणामुळे ते थेट बाजारात विक्रीसाठी आणला होता. त्यावेळी साधारण ८० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली आहे. तेव्हा बाजार हमीभावाप्रमाणे ४५०० ते ४६०० दराने सोयाबीन विक्री करण्यात आली. तेव्हा खरेदी केलेलं सोयाबीन व्यापारांच्या फायद्याचं ठरणार आहे. आजघडीला शेतकऱ्यांकडे २० टक्के सोयाबीन विक्रीसाठी शिल्लक आहे. हमीभावापेक्षा चारशे ते पाचशे रुपये जादा शेतकऱ्यांना मिळत आहे. हा वाढलेला दर दिसत असला तरी शेतकरी सोयाबीनचा दर वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले सोयाबीन सातारा तालुक्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती, अधिकृत लायसेन्सधारक खरेदीदार व्यापाऱ्यांकडेच विक्री करावा. विक्री केल्यानंतर बाजार समितीने अधिकृत केलेली पक्की शेतकरी पट्टी घ्यावी. व्यापारी पक्की पट्टी देत नसेल, तर शेतकऱ्याने तक्रार सातारा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव हणमंत मोरे, पर्यवेक्षक विजय घाडगे यांच्याकडे तक्रार द्याव्यात, असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीने केले आहे.
सोयाबीन खरेदी विक्रीबाबत बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सोयाबीन खरेदीसाठी तालुकानिहाय हमीभाव केंद्र व्हावे, शेतीमाल तारण योजना अमलात यावी. गावागावांत शेतीला गोडाऊन बांधण्यात यावे, आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांना मारक आहे हे धोरण शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले, शासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे शासन म्हणून संबंधित विभागाने पाहणे गरजेचे आहे. मात्र, कोणीही जबाबदारीने त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवसाढवळ्याही लूट सुरू आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन ही लूट थांबविण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी, असं पंजाबराव पाटील म्हणाले आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News