पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नीलिमा चव्हाण यांच्याकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता. सुधीर मोरे यांनी ३१ ऑगस्टच्या रात्री घाटकोपर रेल्वे स्थानकात स्वत:ला ट्रेनसमोर झोकून देत आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यानंतर सुधीर मोरे यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नीलिमा चव्हाण यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. तेव्हापासून नीलिमा चव्हाण या फरार आहेत. आता त्या देशाबाहेर पलायन करु शकतात, अशी कुणकुण रेल्वे पोलिसांना लागली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्याच्या हालचाली सुरु आहेत.
लूकआऊट नोटिसचा वापर देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळं किंवा बंदरांच्या ठिकाणी केला जातो. लूकआऊट नोटीस असलेल्या व्यक्तीला यंत्रणांची परवानगी घेतल्याशिवाय देश सोडून बाहेर जाता येत नाही. नीलिमा चव्हाण यांचे नातेवाईक दुबईत वास्तव्याला आहेत. त्यामुळे चव्हाण अटकेपासून वाचण्यासाठी त्याठिकाणी पळून जाऊ शकतात, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे लूकआऊट नोटीस जारी करुन त्यांचा हा मार्ग बंद करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
सध्या रेल्वे पोलिसांकडून नीलिमा चव्हाण यांच्याविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याच काम सुरु आहे. सुधीर मोरे यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलिमा चव्हाण या गेल्या अनेक दिवसांपासून सुधीर मोरे यांचा मानसिक छळ करत होत्या. त्यांना विक्रोळी पार्कसाईट या प्रभागातून महानगरपालिकेची निवडणूक लढवायची होती. या निवडणुकीचे तिकीट मिळण्यासाठी नीलिमा चव्हाण या सुधीर मोरे यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप आहे. सुधीर मोरे यांनी ज्यादिवशी आत्महत्या केली त्या दिवसभरात नीलिमा चव्हाण यांनी मोरे यांना ५६ फोन कॉल केल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे तर आत्महत्या करण्यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानकात येईपर्यंत सुधीर मोरे फोनवर नीलिमा चव्हाण यांच्याशीच बोलत होते, असा अंदाज आहे. या सगळ्या आरोपांची चौकशी करण्यासाठी रेल्वे पोलिसांना नीलिमा चव्हाण यांची कोठडी हवी आहे. मात्र, अद्याप त्या पोलिसांच्या हाती लागलेल्या नाहीत.