[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, राजावाडी आणि ग्रुप ऑफ वडाळा क्षयरोग रुग्णालयांतील कँटीनमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी या रुग्णालयांमध्ये बायोमिथेनेशन प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांसाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये बायोमिथेनेशनचा हा पहिलाच प्रकल्प आहे. हा प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

पालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये कँटीन असून रुग्णालय परिसरात कर्मचारी, डॉक्टर, परिचारिकांच्या वसाहती आहेत. या ठिकाणी टाकाऊ अन्नपदार्थ, भाजीपाला व अन्य असा दररोज हजारो किलो ओला कचरा निर्माण होतो. हा कचरा थेट डम्पिंग ग्राऊंडवर जातो. या कचऱ्यावर रुग्णालयांच्या आवारातच प्रक्रिया करून, त्यापासून बायोगॅस निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णालयात दोन मेट्रिक टन क्षमतेचा बायोमिथेनेशन प्रकल्प उभारला जाणार आहे.

रुग्णालयातील ओल्या कचऱ्याचे बायोगॅसमध्ये रूपांतर केले जाईल व त्याचा वापर रुग्णालयाच्या कँटीनसाठीच केला जाईल. यामुळे कचरा संकलन आणि प्रक्रियेचे विकेंद्रीकरण होईल, तसेच कचरा वाहतुकीचा खर्च वाचून स्वयंपाकासाठी लागणारा खर्चही कमी होईल. रुग्णालयातून ओला कचरा कमी पडल्यास संबंधित विभागातील हॉटेल व अन्य ठिकाणांहून मिळवला जाईल, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पालिकेने या प्रकल्पासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत एकूण चार कंत्राटदारांनी भाग घेतला होता. त्यापैकी एअरोकेअर एव्हिएशन सर्व्हिसेस या कंत्राटदाराला विविध करांसह नऊ कोटी १२ लाख रुपयांत हे काम देण्यात आले आहे. प्रत्येक रुग्णालय आवारात प्रकल्प उभारणी आणि एक वर्षांसाठी देखभाल कंत्राटदाराला करावी लागणार आहे. या प्रकल्पामुळे रुग्णालये ‘शून्य कचरा’ होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे येतील. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कचरा निर्माण होतो. रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्णांचे वास्तव्य असते. रुग्णालयांतील कँटीनमधून हजारो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण पुरविले जाते. त्यामुळे या प्रकल्पासाठी रुग्णालयांची निवड करण्यात आली असून भविष्यात हा प्रकल्प इतर संकुलात आणि प्रभाग स्तरावर नेण्याचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

…तर वीजनिर्मितीचा विचार
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास येत्या काळात या प्रकल्पातून कचऱ्यातून वीजनिर्मितीचा विचार पालिका करते आहे. यामधून दररोज १७० युनिट वीज निर्माण होण्याचा अंदाज आहे. ही वीज रुग्णालयांच्या आवारातील पदपथ व इतर लहान कामांसाठी वापरण्याचे विचाराधीन आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *