[ad_1]

नागपूर: सहा महिन्यांपूर्वी खून झालेल्या एका ट्रकचालकाचा मृतदेह अद्यापही ताब्यात न मिळाल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी करायचे, असा सवाल त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. महबूब खान (वय ४७) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे.शहरातील कामगारनगर परिसरात राहणारे महबूब खान हे ट्रकचालक होते. गेल्या ७ ऑगस्ट रोजी ते अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे ट्रक घेऊन माल आणण्यासाठी गेले होते. परतीच्यावेळी त्यांनी कुटुंबीयांना लगेच परतत असल्याचे सांगितले; मात्र नंतर त्यांचा मोबाइल स्विच्ड ऑफ झाला होता. दरम्यान ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी १० ऑगस्ट रोजी नागपूरला गिट्टीखदान पोलिस ठाण्यात बेपत्ता असण्याची तक्रार दिली. २० ऑगस्ट रोजी जुना काटोल रोडवरील एका नाल्यात मानवी सांगाडा आढळला होता. त्यावेळी पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी खान यांच्या कुटुंबीयांना बोलावले. तेथे कपडे आणि बेल्टवरून कुटुंबीयांनी हा मृतदेह मेहबूब खान यांचाच असल्याचे सांगितले होते. त्यावेळी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला.तपासात मेहबूब खान यांचा वरुड येथे खून झाल्याचे आढळल्याने वरुड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला. ‘शवविच्छेदनानंतर तुम्हाला पार्थिव दिले जाईल’, असे कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी ते मेयोत गेले असता मेहबूब खानचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर डीएनए चाचणीसाठी हा मृतदेह न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. ‘१५ दिवसांनी या चाचणीचा अहवाल येईल व त्यानंतरच मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात येईल’, असे सांगण्यात आले. त्यास आता सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप खान यांच्या कुटुंबीयाना अंत्यसंस्कारासाठी पार्थिव मिळालेले नाही.अंत्यसंस्कारासाठी मृतदेह द्या, या मागणीसाठी अलिकडेच जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्यक विभागाचे वसीम खान यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दोन दिवसांनी बोलावले होते. आता त्यांनी मेहबूब खानच्या कुटुंबीयांना पोलिस आयुक्तांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हे कुटुंबीय मंगळवारी पोलिस आयुक्तांना भेटून आपली व्यथा मांडतील, असे वसीम खान यांनी ‘मटा’ला सांगितले.आंदोलनाचा इशारापोलिस आयुक्तांना भेटल्यानंतरही मृतदेह मिळत नसेल तर मृताच्या कुटुंबीयांसह न्यायवैद्यक प्रयोगशाळेपुढे आंदोलन करण्याचा इशारा वसीम खान यांनी दिला आहे. मेहबूब खान यांच्या पश्चात पत्नी व चार लहान मुले आहेत. गेलेला जीव परत येणार नाही किमान आता त्यांचा मृतदेह तरी अंत्यसंस्कारासाठी मिळवून द्या, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *