म. टा. प्रतिनिधी, नाशिक: सन २०१७ मध्ये पंचवटीत दुचाकी अपघातात एक महिला ठार व दोघे जखमी झाल्याप्रकरणी आरोपी शेहजाद रेहमान खान (वय २१. रा. विक्रोळी, मुंबई) याला नाशिक न्यायालयाने दोन वर्षे साधा कारावास आणि चौदा हजारांचा दंड ठोठावला. विशेष म्हणजे, ‘ई-कोर्ट’ अंतर्गत या खटल्यात थेट दुबईतून वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष नोंदवून हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला.

नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट २०१७ रोजी तारावालानगर बाजूकडून निमाणीकडे येणाऱ्या रस्त्यावर तलाठी कॉलनीजवळ एमएच १५ सीयू ११५२ क्रमांकाच्या दुचाकीने पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात जयवंत प्रधान आणि सीमा खंडारे हे दोघे गंभीर जखमी झाले होते, तर वत्सला बनकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. जी. जगदाळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. नाशिक जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश प्रतिभा पाटील यांनी या खटल्याचा अंतिम निकाल दिला. या खटल्यात सरकारी अभियोक्ता सुनीता चितळकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. पंचवटी पोलिस ठाण्याचे पैरवी अधिकारी एम. ए. खंबाईत व महिला अंमलदार पी. पी. गोसावी यांनी न्यायप्रक्रियेचा पाठपुरावा केला. सर्व साक्षीदार तपासल्यानंतर सबळ पुराव्यांनिशी न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.

‘व्हीसी’करिता पाठपुरावा

अपघातानंतर मृत व्यक्तीला अपघातावेळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी खासगी रुग्णालयात डॉ. अभिषेक दाधीच यांनी वत्सला बनकर यांना मृत घोषित केले होते. यासह इतर दोघांनाही त्यांना तपासले होते. त्यांच्यासमवेत डॉ. सुजित मांडगेदेखील होते. मांडगे हे नाशिकमध्ये असल्याने त्यांची प्रत्यक्ष साक्ष नोंदविण्यात आली. परंतु, डॉ. दाधीच हे दुबईत स्थायिक झाले आहेत. त्यामुळे सरकारी वकील चितळकर यांनी नाशिक न्यायालयाला विनंती करून दुबईत पाठपुरावा केल्यानंतर डॉ. दाधीच यांच्याशी संपर्क साधला. डॉ. दाधीच यांची नाशिक जिल्हा न्यायालयात ‘व्हीसी’द्वारे साक्ष नोंदविण्यात आली. ही साक्ष न्यायालयाने महत्त्वपूर्ण ठरवली.

अपघात खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. डॉ. अभिषेक दाधीच यांची साक्ष निकालाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने पाठपुरावा केला. दुबईतून त्यांनी साक्ष देण्यास तयारी दर्शविल्यानंतर ई-कोर्टच्या माध्यमातून साक्षीदार डॉ. दाधीच यांना न्यायालयासमक्ष तपासण्यात आले. – सुनीता चितळकर, सरकारी वकीलSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *