मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीसोबत एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये सुरक्षिततेविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासह गेल्या वर्षी कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाया मागे घेणे इत्यादी मुद्यांचा समावेश होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांना सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन केल्यानंतर प्रत्येक छोट्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील दहा आणि मोठ्या मंडळातील २० कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यांना पोलिसांकडून ओळखपत्रही दिले जाईल.
सध्या मुंबईत दहा ते अकरा हजार गणेशोत्सव मंडळे असून त्यानुसार एक लाखांहून अधिक गणसेवकांची निवड होणार आहे. हे गणसेवक आपापल्या मंडळाच्या मंडप आणि त्याच्या परिसराची देखरेख करतील. गणेश मंडळाच्या ठिकाणी दर्शनासाठी अनोळखी व्यक्ती निदर्शनास आल्यास त्याला कसे ओळखावे, पोलिसांना त्वरीत माहिती देणे, मंडपाच्या जवळपास असणाऱ्या इमारतीलगत एखाद्याचे वाहन उभे असेल तर ते किती दिवस त्या ठिकाणी आहे याची माहिती पोलिसांना देणे इत्यादी कामगिरी गणसेवक बजावतील. बैठकीत या मुद्यांवर चर्चा झाली असता प्रत्येक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची नावे, फोटोसहित माहिती त्या-त्या पोलिस ठाण्यांना देण्यास सांगितल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांनी सांगितले.
याशिवाय, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेल्या खटल्यांवरही चर्चा करण्यात आली. राज्य शासनाने १८ ऑगस्ट २०२२ रोजी खटले मागे घेण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे आणि यामध्ये काही अटीही नमूद केल्या आहेत. मात्र, या शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसून विविध मंडळांचे कार्यकर्ते निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचेही बैठकीत समितीकडून निदर्शनास आणून दिले. यावर ऑक्टोबर अखेरपर्यंत यावर निर्णय घेतला जाईल. मात्र आगमन आणि विसर्जनावेळी हाणामारी, वादविवाद झाल्यास घेतलेल्या योग्य निर्णयाचा पुन्हा विचार करावा लागेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केल्याचे दहिबावकर म्हणाले.
या मुद्यांवर चर्चा
– मुंबईतील काही भागांतील नादुरुस्त सीसीटीव्ही दुरुस्त केले जातील. तसेच मुंबईतील काही ठिकाणी विसर्जनाला अडथळे ठरणारे सिग्नल याबाबत योग्य काळजी घेतली जाईल.
– बेवारस वाहनांवर कारवाई केली जाईल.
– पोलिस तसेच वाहतूक पोलिस विभागाची परवानगी घेताना काही तांत्रिक अडचण आल्यास ते तातडीने सुटतील, याकडे लक्ष दिले जाईल.