मारीमुथू हे युट्यूबवरही प्रसिद्ध होते, ते अलीकडेच सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ सिनेमात आणि ‘रेड सँडल वुड’मध्ये दिसले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी बैकियालक्ष्मी आणि दोन मुले- अकिलन आणि ईश्वर्या असा परिवार आहे. मारीमुथू त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे. अलीकडेच ते ‘जेलर’ सिनेमातील खलनायकाच्या सहकाऱ्याच्या भूमिकेत दिसलेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ८ सप्टेंबर रोजी मारीमुथू त्यांचे सहकारी कमलेश यांच्यासोबत टीव्ही शो ‘इथिर नीचल’साठी डबिंग करत होते. चेन्नईतील एका स्टुडिओत हे डबिंग सुरू असताना ते कोसळले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या चेन्नई याठिकाणी असणाऱ्या घरी (विरुगंबक्कममध्ये) नेण्यात येणार आहे, तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान ज्या शोचे डबिंग ते करत होते, त्यातील सहकलाकारही हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दिग्दर्शक होण्यासाठी घरातून पळालेले जी मारीमुथू
जी मारिमुथू यांचा एक किस्सा सांगायचा झाल्यास, ते कॉलिवूडमध्ये दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न घेऊन आले होते. याकरता ते घरातून पळून आले होते. २००८ साली त्यांनी ‘कन्नम कन्नम’मधून फिल्ममेकर म्हणून करिअरला सुरुवात केली. चित्रपट दिग्दर्शनाव्यतिरिक्त त्यांनी तामिळ चित्रपटांमध्ये अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी गीतकार वैरामुथू यांच्यासोबत काम केले. तामिळ चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले.
सोशल मीडियावरही असायचे चर्चेत
‘वली’, ‘जीवा’, ‘पेरियारम पेरुमल’ आणि ‘जेलर’ या प्रोजेक्टमध्ये त्यांनी संस्मरणीय कामं केली आहेत. २०२२ पासून, ते तामिळ टीव्ही मालिका ‘इथिर नीचल’चा एक भाग होते. शिवाय ते युट्यूबवरही प्रसिद्ध होते. त्यांचे अनेक रील्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.