मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त, लंडनमधील त्यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी सुरू असलेली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करून मे महिन्यात ४ किंवा ५ तारखेला ही वाघनखे महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, यात प्रामुख्याने राज्यभरातील शिवपुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाच्या ३५० वर्षपूर्तीनिमित्त लंडनच्या म्युझियममध्ये असलेली त्यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची घोषणा शिंदे सरकारतर्फे करण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षी लंडनला जाऊन व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियमसोबत करारही केला. ही वाघनखे भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नववर्षात ती भारतात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर, या संदर्भातील जवळपास सर्व कायदेशीर आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता ४ ते ५ मे रोजी ही वाघनखे भारतात दाखल होणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने यंदा राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले. राज्यात ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत, त्याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची, तसेच त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी भेट देण्याची सूचना करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

आग्रा येथेही विशेष कार्यक्रम

शिवजयंतीनिमित्त यंदाही आग्रा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

लंडनमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार? दौऱ्याहून परतलेल्या मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया

११ जणांची समिती

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणल्यानंतर, येथील चार संग्रहालयांत ती ठेवण्यात येणार आहेत. त्यात सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, नागपूर येथील सेंट्रल म्युझियम, कोल्हापूर येथील द लक्ष्मी विकास पॅलेस आणि मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा यात समावेश आहे. या वाघनखांची सुरक्षा, प्रदर्शन आणि प्रवासाची रूपरेषा ठरवण्यासाठी ११ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव डॉ. विकास खरगे, पोलिस महासंचालक, मुंबई आणि नागपूरचे पोलिस आयुक्त आणि राज्य पुरातत्त्व विभागाचे डॉ. तेजस गर्गे यांचा समावेश आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *