नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये अनेकदा अजब गोष्टी घडतात, जसे की चेंडू विकेटला लागतो पण बेल्स पडत नाहीत आणि त्यामुळे फलंदाज बाद देखील होत नाही. आंतरराष्ट्रीय मॅच ते आयपीएल सारख्या टी-२० लीगमध्ये अनेकदा असे झाले आहे. अशा घटनांमध्ये चेंडू बेल्स किंवा विकेटला स्पर्श करून जाताना पहायला मिळते.

एका टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अशी घटना घडली ज्यावर चाहत्यांचा विश्वास बसणार नाही. गोलंदाजाने टाकलेला चेंडू दोन विकेटच्या मधून गेला तरी विकेट किंवा बेल्स हलल्या नाहीत. या घटनेचा व्हिडिओ सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.

सुरतमध्ये एका टेनिस बॉल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील एका मॅचमध्ये गोलंदाजाने चेंडू टाकला ज्यावर फलंदाजाने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण बॅट आणि चेंडूचा स्पर्श झाला नाही आणि चेंडू थेट विकेटच्या दिशेने गेला. आता तुम्हाला वाटेल चेंडू विकेटला लागेल आणि फलंदाज बाद होईल. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. चेंडू दोन मिडल आणि लेग स्टंपच्यामधून थेट विकेटकीपरच्या हातात गेला. विकेट तर सोडाच पण बेल्स देखील पडल्या नाहीत.

हा प्रकार पाहून गोलंदाजाने डोक्याला हात लावला. फलंदाजाला देखील कळाले नाही हे झाले तरी कसे. क्रिकेटच्या नियमानुसार बेल्स पडल्या तरच फलंदाजाला बाद दिले जाते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील घडला असा प्रकार

दोन विकेटच्या मधून चेंडू गेल्याची घटना फार कधी ऐकली नसली तरी अशी घटना एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील झाली आहे. १९९७ साली पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मॅच सुरू होती. फैसलाबाद येथे झालेल्या या कसोटीत पाकिस्तानचा फिरकीपटू मुश्ताक अहमदने टाकलेला चेंडू विकेटच्या मधून गेला आणि बेल्स पडल्या नाहीत. तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा पॅट सिमकॉक्स फलंदाजी करत होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *