[ad_1]

मुंबई: कॅप्टन कूल, उत्तम फिनिशर, चेन्नईचा थाला अशी अनेक बिरुदं मिरवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या कारकिर्दीत अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली. टीम इंडिया असो वा मग चेन्नई सुपरकिंग्स, धोनीनं नवोदितांना घेऊन दमदार कामगिरी केली. धोनीनं घडवलेल्या आश्वासक खेळाडूंची यादी केल्यास त्यात ऋतुराज गायकवाडचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. काही महिन्यांपूर्वीच ऋतुराजनं उत्कर्षा पवारसोबत लगीनगाठ बांधली. ३ जूनला दोघे लग्न बंधनात अडकले. उत्कर्षादेखील क्रिकेटपटू असून पुढील महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचं तिचं स्वप्न आहे. त्यासाठी सध्या तिची तयारीदेखील सुरू आहे.

कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही नावाच्या यूट्यूब चॅनेलशी संवाद साधताना उत्कर्षा महेंद्रसिंह धोनीबद्दल भरभरुन बोलली. ‘एम एस धोनी यांचं व्यक्तिमत्त्व खूप वेगळं आहे. तु्म्ही त्यांना भाऊ, दादा किंवा अन्य काही म्हणू शकत नाही. तुम्ही जेव्हा त्यांना भेटता, तेव्हा त्यांना सर म्हणून हाक मारता. पण ते अतिशय विनम्र आणि निगर्वी आहेत. ही बाब अविश्वसनीय आहे. त्यांची विनोदबुद्धीही उत्तम आहे,’ असं उत्कर्षा म्हणाली.

तुम्ही ज्यावेळी त्यांना (धोनी) भेटता, तेव्हा परिस्थिती, वातावरण हलकंफुलकं राहील याची पूर्ण काळजी ते घेतात. त्यांची भेट क्वचितच होते. आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर त्यांच्या भेटीचा योग आला. ते सर्वांनाच कुटुंबाप्रमाणे मानतात. मलाही ते कुटुंबातील एका सदस्यासारखेच वाटले. ऋतुराज असो वा मी, आम्ही दोन महिने बाहेर होतो आणि त्यांनी (धोनी) आम्हाला घराची कमतरता जाणवू दिली नाही, अशा शब्दांत उत्कर्षानं धोनीबद्दल कौतुकोद्गार काढले.

उत्कर्षा पवार स्वत: क्रिकेटपटू आहे. महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व तिनं केलं आहे. १९ वर्षांखालील संघात तिची निवड झाली होती. महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघाकडूनही ती खेळली आहे. उत्कर्षा अष्टपैलू खेळाडू आहे. १८ महिन्यांपूर्वी ती शेवटचा सामना खेळली आहे. सध्या ती पुण्यातील आरोग्य विज्ञान संस्थेत शिकत आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून सध्या तिची कठोर मेहनत सुरू आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *