अहमदनगर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस सोडून अपक्ष उमेदवारी केलेले आमदार सत्यजित तांबे यांचीही सूचक प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीवर बोट ठेवत ‘खरं तर आपल्याला खूप काही बोलायचं आहे, पण मी बोलणार नाही,’ अशी प्रतिक्रिया आमदार तांबे यांनी व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे चव्हाण यांच्या या भूमिकेनंतर तांबे यांचे मामा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

या घडामोडींवर भाष्य करताना आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जीवाचं रान करणाऱ्या आणि स्वातंत्र्यानंतर देशाचं भविष्य घडवणाऱ्या काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील स्थिती पाहून मनाला प्रचंड वेदना होत आहेत. ज्या संघटनेसाठी मी आयुष्याची २२ वर्षं तन, मन आणि धन सर्व पणाला लावून काम केलं, त्या पक्षाची अशी अवस्था पाहून मी अस्वस्थ झालो आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना मी सातत्याने राज्यभर दौरे करत प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी प्रयत्न केला. अनेक हुशार आणि धडाडीच्या तरुण कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या प्रवाहात आणलं. खरं तर खूप काही बोलायचं आहे, पण मी बोलणार नाही, असे सांगत तांबे यांनी आपल्या आणि इतरांच्या घुसमटीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत काँग्रेस पक्षाच्या वाताहतीकडेही लक्ष वेधले आहे.
काल जागावाटपाची चर्चा, प्रभारींशी हितगुज केलं, उद्या ११ वाजता येतो सांगितलं अन्… पृथ्वीराजबाबांनी सांगितली ‘अंदर की बात’

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्यावेळी तांबे यांनी अचानक भूमिका घेत काँग्रेसची उमेदवारी मिळालेली असूनही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती, मात्र ते शेवटपर्यंत भाजपमध्ये गेले नाही. भाजपचा पाठिंबा मिळवून त्यांनी विजय संपादन केला. त्यांच्या या कृतीमुळे त्यांचे मामा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मात्र चांगलीच कोंडी झाली होती. आता अशोक चाव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतर थोरात काय भूमिका घेणार, याकडेही लक्ष लागले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *