[ad_1]

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज, शनिवारपासून येथे सुरू होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेसाठी ‘भारत मंडपम’ सज्ज झाले आहे. भारताकडून राबविल्या जाणाऱ्या अनेक योजना आणि सेवांची माहिती परिषदेच्या ठिकाणी ‘थिमॅटिक झोन’मध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. यात ‘यूपीआय’ ते ई-संजीवनी या राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवेसह भारतातील काही प्रमुख डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे.

भारत मंडपम येथे स्थापन केलेल्या ‘डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन’ला भेट देणाऱ्या प्रतिनिधी आणि इतर पाहुण्यांना व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे डिजिटल इंडियाच्या उपक्रमांचा प्रवास अनुभवता येणार आहे. शिखर परिषदेच्या ठिकाणी या विभागाला ‘मुख्य आकर्षण’ असे सरकारने संबोधले असून, हा विभाग चार आणि १४ क्रमांकाच्या सभागृहात स्थापन करण्यात आला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’वर आधारित भाषिणी, आधार, डिजिलॉकर आणि शिक्षकांसाठीचे दीक्षा पोर्टलदेखील प्रदर्शित करण्यात आले आहे. भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधासारख्या क्षेत्रात विशेषत: ई-संजीवनी किओस्कच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीचा अनुभव प्रतिनिधींना घेता येणार आहे.

‘जी-२० इंडिया’ने ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘आरबीआय इनोव्हेशन हब पॅव्हिलियन’, ‘डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन’ आणि भारत मंडपम येथे प्रतिनिधींसाठी उभारलेल्या इतर सुविधांची झलक शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये जी-२० चे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला हे सर्व जी-२० सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधी आणि आमंत्रित देशांसाठी उभारलेल्या कार्यालयांमध्ये पाहत असल्याचे दिसत आहे. भारतातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व त्याची वाढ ‘डिजिटल इंडिया एक्सपिरिअन्स झोन’मध्ये दाखविण्यात आली आहे, असे श्रृंगला व्हिडीओमध्ये म्हणाले. ‘हा डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन’ अतिशय विशेष असून, भारताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान जगासमोर दाखवण्यास सक्षम करणार आहे, असेही ते म्हणाले.
G20 Summit : अमेरिकेसोबत नवे मैत्रीपर्व; मोदी-बायडेन भेटीतून भारताला काय मिळणार?
भारत मंडपममध्ये आणखी काय?

– शिखर परिषद सभागृहाबाहेर ‘कल्चर कॉरिडॉर- जी-२० डिजिटल म्युझियम’, ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ प्रदर्शन आणि नटराजाची २७ फूट भव्य अष्टधातू मूर्ती
– सभागृह क्रमांक ४ आणि १४ मध्ये ‘डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन’सह डिजिटल इंडिया प्रवास याबाबतचे मान्यवरांकडून अनुभव कथन
– मिशन डिजिटल इंडिया भाषिणी (भाषा इंटरफेस फॉर इंडिया) द्वारे चालविले जाणारे नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन (एनएलटीएम) आणि आधार प्रदर्शन
– युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) द्वारे कल्याणकारी योजनांसाठी जारी आवश्यक आधारची माहिती
– डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नेटवर्कवर वस्तू-सेवांच्या देवाणघेवाणीच्या सर्व पैलूंसाठी खुल्या नेटवर्कला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ (ओएनडीसी) या प्लॅटफॉर्मची माहिती प्रदर्शित
– आरबीआय इनोव्हेशन हब पॅव्हेलियनमध्ये क्रेडिट आणि डिजिटल रुपयाबद्दलच्या माहितीचे सादरीकरण
– सभागृह क्रमांक १४ मधील प्रतिनिधी कार्यालयांमध्ये प्रत्येक कार्यालयाच्या जागेत अनेक सुविधांची निर्मिती
– जी-२० लोगोसह सेल्फी पॉइंट आणि भारताचा समृद्ध वारसा दर्शविणारी सजावट

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *