हैदराबाद : तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी पहाटे नंद्याल पोलिसांनी अटक केली, असे पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांच्या नावाचे अटक वॉरंट बजावले होते. एपी स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन घोटाळा प्रकरणात नायडूंवर आरोप आहेत.
नंद्याल रेंजचे डीआयजी रघुरामी रेड्डी आणि सीआयडी यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचा मोठा ताफा शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये नायडूंना ताब्यात घेण्यासाठी गेला. त्यावेळी ते कॅराव्हॅनमध्ये विश्रांती घेत होते.
त्याठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या टीडीपी कार्यकर्त्यांनी पोलिसांना तीव्र प्रतिकार केला. चंद्राबाबू नायडूंचे रक्षण करणार्या एसपीजी दलांनीही पोलिसांना परवानगी दिली नाही. नियमानुसार पहाटे साडेपाच वाजेपर्यंत कोणालाही नायडूंपर्यंत पोहोचू दिलं जाऊ शकत नाही, असं कारण एसपीजीने पुढे केलं.
अखेर सकाळी सहा वाजताच्या सुमारास, पोलिसांनी चंद्राबाबू नायडू यांच्या कॅराव्हॅनचे दरवाजे ठोठावले, त्यांना खाली आणले आणि अटक केली.
डीआयजींनी दिलेल्या माहितीनुसार एपी स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन घोटाळा प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ते आरोपी क्रमांक एक असून त्या दृष्टीने त्यांना नोटीस देण्यात आली होती.