[ad_1]

जी-२० काय आहे?

जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा हा गट आहे. यामध्ये विकसित आणि विकसनशील देशांचा समावेश आहे. आशियातील आर्थिक संकटानंतर सन १९९९मध्ये या गटाची स्थापना झाली. सुरुवातीला संबंधित देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्थी बँकांचे गव्हर्नर यांचा हा गट होता. जागतिक आर्थिक विषयांवर चर्चा आणि समन्वय करण्यासाठी या गटाची स्थापना झाली. सन २००७मध्ये संबंधित देशांच्या प्रमुखांचा समावेश यामध्ये झाला. जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. २००९मध्ये जी-२० हा मंच आंरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठी महत्त्वाचा मंच म्हणून पुढे आला.

जी-२० गटाने प्रामुख्याने समग्र आर्थिक समस्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच वेळी व्यापार, शाश्वत विकास, आरोग्य, शेती, ऊर्जा, पर्यावरण, हवामान बदल आणि भ्रष्टाचारविरोधी लढाई या विषयांवरही या गटाने आपल्या अजेंड्याचा विस्तार केला आहे. चक्रनेमक्रमेन प्रत्येक सदस्य देशाला या गटाचे अध्यक्षपद मिळते. भारताचे अध्यक्षपद एक डिसेंबर २०२२पासून सुरू झाले आणि या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याचा समारोप होईल.

जी-२० गटामध्ये दोन मार्ग आहेत. एक म्हणजे संबंधित देशांचे अर्थमंत्री, मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर आणि शेर्पा. वर्षभर त्यांच्या बैठका होत असतात. त्यानंतर अखेरीस शिखर परिषद होते आणि अंतिम जाहीरनामा स्वीकारला जातो. शेर्पा हे विविध नेत्यांचे दूत म्हणून काम करतात आणि इतर सर्व घटकांकडून मिळालेली माहिती अंतिम निवेदनासाठी देत असतात. त्यामध्ये वित्तीय आणि संवादी गटांकडून आलेल्या माहितीचाही समावेश असतो. संवादी गटांमध्ये जी-२० देशांमधील सिव्हिल सोसायटी, संसद सदस्य, थिंक टँक, महिला, तरुण, कामगार, व्यवसाय आणि संशोधक यांचा समावेश आहे. परिषदेची यंदाची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम – एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही आहे. या गटाचे पुढील अध्यक्षपद ब्राझीलकडे असणार आहे.

सदस्य देश
जी-२० गटामध्ये १९ देश आणि युरोपीयन महासंघाचा समावेश आहे. या देशांमध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, तुर्की, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. जगाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनापैकी या देशांचा वाटा ८५ टक्के इतका आहे. जगाच्या एकूण व्यापारापैकी या देशांचा वाटा ७५ टक्के इतका आहे. याशिवाय जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोकसंख्या या देशांमध्ये राहते.

सदस्य देशांशिवाय परिषदेसाठी बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, आर्थिक स्थिरता मंडळ; तसेच ‘एयू’, ‘एयूडीए’, ‘एनईपीएडी’ आणि ‘आसिआन’ यासारख्या प्रादेशिक संघटनांचे प्रमुख यांनाही परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (एसआयए), सीडीआरआय आणि आशियाई विकास बँक यांना अतिथी संस्था म्हणून निमंत्रित केले आहे.

भारताचे विषय
भारत या परिषदेच्या निमित्ताने आपल्याकडील सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांचे दर्शन घडवणार आहे. त्यामध्ये आधार, यूपीआय, कोविन, डिजिलॉकर आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे. शाश्वत विकासाचे धोरण म्हणून जगभरात त्याची अंमलबजावणी व्हावी हा यामागील हेतू आहे. याशिवाय कर्जांची शाश्वतता, पर्यावरणासाठी वित्तपुरवठा आणि नाणेनिधी आणि जागतिक बँकेसारख्या जागतिक वित्तीय संस्थांमधील सुधारणा आदी मुद्दे भारत मांडणार आहे.

क्रिप्टोकरन्सीबाबत जागतिक चौकट तयार करणे, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना चालना देणे, जागतिक समग्र आर्थिक स्थैरय् आणि महिलांच्या नेतृत्वातील विकास आदी मुद्द्यांवरही भारताचा भर असणार आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि स्टार्टअप हे विषयदेखील भारत चर्चेसाठी मांडणार आहे. जी-२० गटामध्ये आफ्रिकन युनियनला सहभागी करून घ्यावे ही मागणी भारताने मांडली आहे. बहुतांश सदस्य देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

वादाचे मुद्दे
रशिया-युक्रेन युद्ध हा जी-२० गटामध्ये मोठा वादाचा मुद्दा ठरणार आहे. सदस्य देशांमध्ये चर्चेमध्ये एकमत होण्यात त्याचा अडथळा ठरणार आहे. या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळीवर झालेला परिणाम यांचा संबंध सदस्य देशांना द्यायचा आहे. त्याचा समावेश अंतिम निवेदनात व्हावा असेही बहुतांश सदस्य देशांना वाटते. मात्र, रशिया आणि चीनने युद्धाच्या युक्रेनमधील युद्ध आणि त्याचा जागतिक अर्थकारणावरील परिणाम याचा कोणत्याही संदर्भ निवेदनात समाविष्ट करण्याला विरोध केला आहे.

जी-२० हा आर्थिक मंच आहे. त्यामुळे या गटाने जागतिक आर्थिक प्रगतीला चालना देण्यासह जीवनाचा संघर्ष, अन्नधान्य आणि इंधनाच्या किमती यासह इतर आर्थिक विषयांवर भर द्यावा, असे भारतासह विकसनशील देशांचे म्हणणे आहे. सध्याचे युग युद्धाचे नाही आणि सर्व प्रश्न चर्चा आणि मुत्सद्देगिरीने सोडवले जावेत, अशी भूमिका भारताने मांडली आहे. शिखर परिषदेमध्ये प्रमुख नेत्यांच्या चर्चेनंतर सदस्य देशांमधील मतभेद कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिल्लीत सुरक्षा व तयारी
पोलिस
दिल्ली पोलिस दलात सुमारे ८३ हजार कर्मचारी असून, त्यापैकी २५ हजार कर्मचारी जी-२० शिखर परिषदेच्या स्थळाजवळी मार्गांवर तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ४०० पीसीआर व्हॅन आणि १०० शीघ्र कृती दलाची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. दिल्लीत ११ सुरक्षा झोन, तसेच तीन नियंत्रित झोन असणार आहेत. वाहतूक पोलिस तेथे नियंत्रण करणार आहेत. पर्यटन पोलिसदेखील तैनात असणार आहेत. याशिवाय पोलिस स्निपर्स बंदुकांसह सज्ज असणार आहेत. जवानांना ड्रोन हल्ल्याचा सामना करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

हॉर्टिकल्चर
दिल्लीतील रस्त्यांवर सुमारे सहा लाख ८० हजार शोभिवंत झाड्यांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विविध प्रजातींची झाडे आहेत. याशिवाय ३३ महत्त्वाच्या मार्गांवर सुमारे ४२ लाख झुडपे लावण्यात आली आहेत. दिल्लीत ३०० अधिकारी आणि कर्मचारी या रोपांची काळजी घेत आहेत. जी-२०चा संदेश देणारे फुलांचे फलकही लावण्यात आले आहेत. दिल्लीतील ३३ उद्याने आणि मुख्य मार्गालगतची महत्त्वाची ठिकाणे, बाजारपेठा येथेही सुशोभिकरण करण्यात आले आहे.

कारंजी
विविध प्रकारची १५० नवी कारंजी दिल्लीत बसवण्यात आली आहेत. यामध्ये धोलपूर स्टोनपासून तयार केलेल्या कारंजांचाही समावेश आहे. घोडा, ज्वालामुखी, बैल, सिंह, शिवलिंग आदी विविध आकारांमध्ये ही कारंजी तयार करण्यात आली आहेत.

शिल्पे
परिषदेनिमित्त दिल्लीमध्ये विविध मार्गांवर १०० शिल्पेही बसविण्यात आली आहेत. निगमबोध घाटावर शिवशंकराचे शिल्प बसविण्यात आले आहे. दिल्ली गेट येथे कोनार्क चक्र, रोझ गार्डनजवळील वाय पॉइंट येथे नृत्य करणारे शिल्प, उलानबटावर रोडवर १३ फुटी सिंहाचे शिल्प बसविण्यात आले आहे.

रस्ते

दिल्लीतील ६० रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. शहरातील ३५ महत्त्वाच्या रस्त्यांवर स्वच्छतेसाठी दिल्ली महापालिकेने सक्शन व जेटिंग मशिन तैनात केल्या आहेत. रस्त्यांवर पाणी साचणाऱ्या १५ ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
G20 Summit : जी २० ची पहिली बैठक कधी झाली? कोणते देश आहेत सदस्य, जाणून घ्या संमेलनाचं महत्त्व
उड्डाणपूल
दिल्लीतील १५ उड्डाणपुलांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये ओबेरॉय हॉटेल उड्डाणपूल, लोधी उड्डाणपूल, साउथ एक्स्टेंशन उड्डाणपूल, कालकाजी उड्डाणपूल, आयआयटी उड्डाणपूल, आफ्रिका अव्हेन्यू उड्डाणपूल, मयूर विहार उड्डाणपूल यांचा समावेश आहे.

वीज
प्रगती मैदानातील वीज नियंत्रण कक्षात २४ जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. २४ तास येथून काम चालणार आहे. जी-२०च्या बोधचिन्हासह १३२० बॅकलिट पॅनेल बसविण्यात आले आहेत. याशिवाय सहाशे ठिकाणी झाडांवर रोषणाई करण्यात आली आहे.

वैद्यकीय सज्जता
८० डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक परिषदेनिमित्त तैनात असेल. याशिवाय ७० अत्याधुनिक रुग्णवाहिका आणि इतर ६० रुग्णवाहिकादेखील तैनात ठेवण्यात आल्या आहेत. परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या ४३ देश व आंतरराष्ट्रीय संस्थांचे ध्वज शहरात लावण्यात आले आहेत. दिल्लीतील २० ठिकाणी हे ध्वज लावण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *