मुंबई: राज्याच्या राजकारणात आज एक मोठी घटना घडली. गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसची हात धरलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आज भाजपचं उपरणं गळ्यात घातलं. काल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या अशोक चव्हाणांनी आज भाजप कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश घेतला. मात्र, अचानक इतक्या वर्षांनी काँग्रेसला सोडून भाजपात आलेले अशोक चव्हाण आशिष शेलारांचं नाव घेताना जरा गडबडले. त्यांच्या तोंडून सवयीप्रमाणे मुंबई भाजप अध्यक्षच्या जागी ‘मुंबई काँग्रेस अध्यक्ष’ असा उल्लेख आला आणि संपूर्ण कार्यालयात एकच हशा पिकला.

अशोक चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होते. सुरुवात करत ते म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष… इतकं बोलताच संपूर्ण कार्यालयात एकच हशा पिकला. फडणवीसांनी लगेच चव्हाणांना सांगितलं भाजप अध्यक्ष… यानंतर कार्यालयात उपस्थित पदाधिकारी, नेते मंडळी, पत्रकार सारेच खळखळून हसले. त्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, हा सवयीचा परिणाम आहे. ५० वर्षांची सवय आहे. भाजपच्या कार्यालयात ही माझी पहिली पत्रकार परिषद आहे, त्यामुळे पहिलाच दिवस असल्याने तेवढं आज माफ करा. कालच राजीनामा दिला, त्यामुळे एकदम स्विच ओव्हर झाला आहे.

अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश

अशोक चव्हाण यांनी कालच (१२ फेब्रुवारी) काँग्रेसच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दोन दिवस विचार करेन असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, अवघ्या २४ तासातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, गिरीश महाजन, हर्षवर्धन पाटील, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर भाजप कार्यालयात उपस्थित होते.

नव्या राजकीय आयुष्याला सुरुवात करतोय – अशोक चव्हाण

‘मी आज नव्या राजकीय आयुष्याला सुरुवात करत आहे. गेल्या ३८ वर्षांचा प्रवास बदलून नवा मार्ग स्वीकारला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या आणि राज्याच्या विकासात योगदान देता यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. मी जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देणार आहे. आगामी निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे. मी कुणावरही टीका करणार नाही’, असं यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *