सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेची ४ बाद २४ अशी अवस्था केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांना यावेळी दोन अंकी धावसंख्याही करता आली नाही. चार विकेट्स लवकर बाद झाल्यावर दक्षिण आफ्रिकेला सावरले ते डेव्हिड मिलरने. यावेळी मिलरने आठ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १०१ धावांची खेळी साकारली. मिलरला यावेळी हेन्रिच क्लासिनने ४७ धावांची खेळी साकारली आणि मिलरला चांगली साथ दिली. या दोघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला २१२ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जोश हेझलवूड आणि ट्रेव्हिस हेड यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
दक्षिण आफ्रिकेचे २१३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासाठी माफक वाटत होते. कारण ग्लेन मॅक्सवेलनेच एका सामन्यात नाबाद २०० धावा केल्या होत्या. पण सेमी फायनलचे दडपण हे किती जास्त असते, याचा प्रत्यय यावेळी आला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. त्यांना ६० धावांची सलामी मिळाली. ट्रेव्हिस हेडने यावेळी ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारली. पण या सामन्यात डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्हन स्मिथसारखे मातब्बर फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची ६ बाद १७४ अशी अवस्था झाली होती आणि सामना चांगलाच रंगतदार अवस्थेत आला होता. पण त्यानंतर जोश इन्गिसने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला, पण २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर सामना चांगलाच रंगतदार झाला.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९९९ सालीही सेमी फायनल झाली होती. त्यावेळीचा सामना टाय झाला होता. पण साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता.